Punjab Kings Playoff Qualification Chances नवी दिल्ली : आयपीएलच्या 19 व्या हंगामात पहिल्या महिनाभर गुणतालिकेत पहिल्या स्थानावर असलेल्या पंजाब किंग्जला मोठा धक्का बसला आहे. सलग पाच सामन्यात पराभव झाल्यानं पंजाब किंग्जचं यंदाच्या आयपीएलमधील स्थान धोक्यात आलं आहे. पंजाबनं पहिल्या 7 मॅचमध्ये एकही पराभव स्वीकारला नव्हता. मात्र, त्यानंतर सलग पाच सामन्यात पंजाबचे पराभव झाले. यामुळं सध्या ते गुणतालिकेत चौथ्या स्थानावर घसरले आहेत. आता पंजाबला प्लेऑफमध्ये प्रवेश करायचा असेल तर त्यांना उर्वरित दोन्ही सामने मोठ्या फरकानं जिंकावे लागतील.
श्रेयस अय्यरचा पंजाब किंग्ज गुणतालिकेत पहिल्या दोनमध्ये राहील असं चित्र होतं. मात्र, सध्या त्यांना प्लेऑफमध्ये प्रवेश मिळतो की नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे. उर्वरित दोन सामन्यात पंजाबच्या यंदाच्या आयपीएलमधील भविष्याचा फैसला होणार आहे. पंजाब किंग्जला आता उर्वरित दोन्ही सामने मोठ्या फरकानं जिंकावे लागणार आहेत. तरच ते प्लेऑफमध्ये प्रवेश करु शकतात.
पंजाब किंग्जचं प्लेऑफचं समीकरण
पंजाब किंग्जनं आतापर्यंत 12 सामने खेळले आहेत. यामध्ये त्यांच्याकडे 13 गुण आहेत. पंजाब किंग्जनं उर्वरित दोन सामने जिंकले तर त्यांचे गुण 17 होतील. आयपीएलचा इतिहास पाहिला तर 17 गुण असणारा संघ प्लेऑफसाठी क्वालिफाय होतो. त्यामुळं पंजाब किंग्जला तिथपर्यंत पोहोचण्यासाठी दोन्ही सामन्यांमध्ये विजय मिळवावा लागेल.
पंजाब किंग्जनं उर्वरित दोन सामन्यांपैकी एक सामना जिंकला आणि दुसऱ्या सामन्यात त्यांचा पराभव झाला तर त्यांचे गुण 15 होतील. यामुळं त्यांचा प्लेऑफचा प्रवास संपू शकतो, मात्र इतर संघांच्या कामगिरीवर त्यांचा प्लेऑफमधील प्रवेश अवलंबून असेल. पंजाब किंग्जचे पुढील 2 सामने रॉयल चॅलेजर्स बंगळुरु आणि लखनौ सुपर जायंटस या संघांबरोबर आहे. यापैकी आरसीबीचा संघ चांगल्या फॉर्ममध्ये आहे.
पंजाबच्या खराब कामगिरीचं कारण काय?
पंजाब किंग्जच्या सलग पाच सामन्यांमधील पराभवाचं कारण त्यांची खराब गोलंदाजी हे आहे. गेल्या पाच सामन्यांचा विचार केला असता चारवेळा पंजाबच्या गोलंदाजांनी 200 हून अधिक धावा दिल्या आहेत. या पाच सामन्यांमध्ये पंजाबचा संघ तीन वेळा 200 हून अधिक धावा करुन देखील धावसंख्येचा बचाव करु शकला नाही.
