SRH vs PBKS : कूपर कॉनोलीचं शतक वाया, श्रेयस अय्यरच्या पंजाब किंग्जचा सलग तिसऱ्या पराभव, सनरायजर्स हैदराबाद गुणतालिकेत टॉपवर
SRH vs PBKS: सनरायजर्स हैदराबादनं पंजाब किंग्जला पराभूत करत गुणतालिकेत पहिल्या स्थानी झेप घेतली आहे. सनरायजर्स हैदराबादच्या नावावर 14 गुणांची नोंद झाली आहे.

SRH vs PBKS हैदराबाद: आयपीएलच्या 19 व्या हंगामात गेल्या महिन्याभरापासून गुणतालिकेत पहिल्या स्थानावर असणाऱ्या पंजाब किंग्जला मोठा धक्का बसला आहे. श्रेयस अय्यरच्या पंजाब किंग्जचा सलग तिसरा पराभव झाल्यानं ते दुसऱ्या स्थानी घसरले आहेत. सनरायजर्स हैदराबादनं पंजाब किंग्जला पराभूत करत गुणतालिकेत पहिल्या स्थानावर झेप घेतली. सनरायजर्स हैदराबादनं प्रथम फलंदाजी करताना 20 ओव्हरमध्ये 4 विकेट गमावून 235 धावा केल्या होत्या. या धावसंख्येचा पाठलाग करताना पंजाबचे फलंदाज टिकाव धरू शकले नाहीत. एकट्या कूपर कॉनोलीनं पंजाबकडून प्रतिकार केला, मात्र त्याची कामगिरी संघाला विजय मिळवून देऊ शकली नाही. कूपर कॉनोलीला पंजाबच्या दुसऱ्या खेळाडूकडून साथ मिळाली नाही. कूपर कॉनोलीनं त्याच्या टी 20 करिअरमधील पहिलं शतक पूर्ण केलं. पंजाबनं 20 ओव्हरमध्ये 7 बाद 202 धावा केल्या, यामुळं त्यांचा 33 धावांनी पराभव झाला.
पंजाबच्या पराभवाची हॅटट्रिक
सनरायजर्स हैदराबादनं प्रथम फलंदाजी करताना 20 ओव्हरमध्ये 4 बाद 235 धावा केल्या. हैदाराबादकडून हेनरिक क्लासेन आणि ईशान किशन यांनी अर्धशतकं केली. पंजाबकडून चहल आणि अर्शदीपला विकेट मिळाली. ट्रॅविस हेड आणि अभिषेक शर्मानं हैदराबादला चांगली सुरुवात करुन दिली. दोघांनी 54 धावांची भागीदारी केली. अभिषेक शर्मानं 13 बॉलमध्ये 35 धावा केल्या. ट्रॅविस हेडनं 38 धावा केल्या. यानंतर इशान किशननं 55 आणि क्लासेननं 69 धावा केल्या.
पंजाब किंग्जच्या डावाची सुरुवात खराब झाली. पंजाबचे दोन्ही सलामीवर प्रियांश आर्या आणि प्रभसिमरन सिंह मोठी धावसंख्या करु शकले नाहीत. पंजाबनं पहिल्या दोन विकेट 4 धावांवर गमावल्या होत्या. मार्कस स्टॉयनिस यानं 28 धावा केल्या. शशांक सिंह यानं 4 धावा केल्या. पंजाबचा कॅप्टन श्रेयस अय्यर 5 धावा करु शकला. तर, पंजाबकडून कूपर कॉनोली यानं सर्वाधिक नाबाद 107 धावा केल्या.
पंजाब किंग्जचा सलग तिसऱ्या सामन्यात पराभव झाल्यानं त्यांची गुणतालिकेत पहिल्या स्थानावरुन दुसऱ्या स्थानी घसरण झाली आहे. पंजाबच्या खेळाडूंचं खराब दर्जाचं क्षेत्ररक्षण देखील त्यांच्या पराभवाला कारणीभूत ठरलं.
पंजाब किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): प्रभसिमरन सिंह (विकेट कीपर), कूपर कॉनोली, श्रेयस अय्यर (कर्मधार), शशांक सिंह, सूर्यांश शेडगे, मार्कस स्टोइनिस, मार्को जेनसन, लॉकी फर्ग्यूसन, विजयकुमार व्यश्यक, अर्शदीप सिंह, युजवेंद्र चहल
सनरायजर्स हैदराबाद (प्लेइंग इलेव्हन): अभिषेक शर्मा, ट्रॅविस हेड, ईशान किशन (विकेट कीपर), हेनरिक क्लासेन, सलिल अरोरा, स्मरण रविचंद्रन, नीतीश कुमार रेड्डी, पॅट कमिन्स (कर्णधार), शिवांग कुमार, ईशान मलिंगा, साकिब हुसैन




















