Virat Kohli Angry Reaction Rajat Patidar: आयपीएल 2025 च्या हंगामात काल (10 एप्रिल) दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bengaluru vs Delhi Capitals) यांच्यात सामना खेळवण्यात आला. बंगळुरुला त्यांच्याच घरच्या मैदानावर दारुण पराभव पत्करावा लागला. दिल्लीने 6 विकेट्सने बंगळुरुचा पराभव केला.
164 धावांचे लक्ष्य राखण्यासाठी बंगळुरू मैदानात उतरला. बंगळुरुने गोलंदाजी करताना सुरुवात चांगली केली. दिल्लीने 30 धावांवर 3 विकेट गमावल्या होत्या. पण केएल राहुलची 93 धावांची नाबाद खेळी संपूर्ण सामना फिरला. दिल्लीने यासह सलग चौथा विजय मिळविला. बंगळुरूला 20 षटकांत 7 बाद 163 धावांवर रोखल्यानंतर दिल्लीने 17.5 षटकांमध्येच 4 बाद 169 धावा केल्या. दिल्ली आणि बंगळुरुच्या सामनादरम्यानचा विराट कोहलीचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये विराट कोहली (Virat Kohli) चांगलाच संतापल्याचे दिसून येत आहे.
कोहली संतापला; थेट दिनेश कार्तिकला जाऊन भेटला, VIDEO: (Virat Kohli Angry Reaction Rajat Patidar)
सदर व्हिडीओ दिल्ली कॅपिटल्सच्या डावाच्या 16 व्या षटकातील आहे. केएल राहुलने आक्रमक पद्धतीने फटके मारण्यास सुरुवात केली, त्यानंतर विराट कोहली आरसीबीचा प्रशिक्षक दिनेश कार्तिकशी रागाने बोलताना दिसला. या व्हिडीओमुळे कोहली बंगळुरूचा कर्णधार रजत पाटीदारवर खूश नसल्याचे बोलले जात आहे. या सामन्यात समालोचन करणारे माजी भारतीय क्रिकेटपटू आकाश चोप्रा आणि वीरेंद्र सेहवाग म्हणाले की, जर विराट कोणत्याही निर्णयावर नाराज असेल तर त्याने कर्णधार पाटीदारशी त्याबद्दल बोलले पाहिजे. मैदानावर घेतलेल्या काही निर्णयांमुळे विराट कोहलीने केवळ दिनेश कार्तिकशीच नव्हे तर भुवनेश्वर कुमारशीही बोलल्याचा दावा एका चाहत्याने सोशल मीडियावर केला. सामना संपल्यानंतर विराट कोहली आणि रजत पाटीदार एकमेकांसमोर येताच विराट कोहली रागात होता, असा दावा नेटकऱ्यांकडून करण्यात येत आहे. मात्र विराट कोहली नेमक्या कोणत्या कारणासाठी नाराज होता, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.