हैदराबाद : आयपीएलच्या 27 व्या सामन्यात हैदराबादच्या मैदानावर धावांचा पाऊस पडला. पहिल्यांदा फलंदाजी करताना पंजाब किंग्जनं 245  धावा केल्या. या धावसंख्येचा पाठलाग करताना हैदराबादनं 8 विकेटनं आणि 9 बॉल बाकी ठेवत विजय मिळवला. ट्रेविस हेड आणि अभिषेक शर्मानं केलेल्या वादळी फलंदाजीमुळं पंजाबच्या गोलंदाजीची धूळदाण उडाली. अभिषेक शर्मानं 141 धावा केल्या तर ट्रेविस हेडनं 71 धावा केल्या. 

हैदराबादला सलग 4 सामन्यात पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर आजच्या सामन्यात त्यांनी विजय मिळवला. आता हैदराबादचा संघ गुणतालिकेत 8 व्या स्थानावर पोहोचला आहे. 

आयपीएलच्या इतिहासातील सर्वाधिक धावसंख्येचा पाठलाग करणारा सनरायजर्स हैदराबाद हा संघ दुसरा ठरला. 245  धावांचा यशस्वी पाठलाग हैदराबादनं केला. 

पंजाब किंग्जनं टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रियांश आर्या, प्रभासिमरन सिंह यांनी पंजाबला चांगली सुरुवात करुन दिली. यानंतर कॅप्टन श्रेयस अय्यर 82  धावा केल्या. पंजाबला शेवटच्या ओव्हरमधील स्टॉयनिसची फटकेबाजी वगळता आक्रमक फलंदाजीचा सूर कायम राखता आला नाही. त्यामुळं पंजाबनं 245  धावा केल्या. 

हैदराबादच्या ऑरेंज आर्मीचं वादळ

पंजाबनं हैदराबादसमोर ठेवलेल्या 245  धावांचा पाठलाग करण्यासाठी अभिषेक शर्मा आणि ट्रेविस हेडची जोडी मैदानात उतरली. यश दयालच्या गोलंदाजीवर अभिषेक शर्मा बाद झाला होता, मात्र, त्याच्या नशिबानं तो बॉल नो असल्याचं पंचांनी जाहीर केलं. यानंतर अभिषेक शर्मा आणि ट्रेविस हेडनं चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला. ट्रेविस हेड 171 धावांची भागीदारी झालेली असताना बाद झाला. त्यानंतर अभिषेक शर्मानं राहिलेलं काम पूर्ण केलं. ट्रेविस हेडनं  3  षटकार आणि 9 चौकार मारले. याशिवाय दुसरीकडे अभिषेक शर्मानं देखील पंजाबच्या गोलंदाजांची धुलाई केली. अभिषेक शर्मानं 55 बॉलमध्ये 141  धावा केल्या. यामध्ये त्यानं 14 चौकार आणि 10  षटकार मारले. 

दरम्यान, अभिषेक शर्मा आणि ट्रेविस हेड बाद झाल्यानंतर हैदराबादच्या विजयावर  हेनरिक क्लासेननं 21 धावा करत विजयावर शिक्कामोर्तब केलं. आजच्या विजयानं हैदराबादनं आठव्या स्थानावर झेप घेतली.

हैदराबादचा संघ : अभिषेक शर्मा, ट्रेविस हेड, ईशान किशन, नीतीश कुमार रेड्डी, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अनिकेत वर्मा, पॅट कमिन्स (कॅप्टन), हर्षल पटेल, झीशान अन्सारी, मोहम्मद शमी आणि ईशान मलिंगा

पंजाब किंग्ज : प्रियांश आर्या, प्रभसिमरन सिंह (विकेटकीपर), श्रेयस अय्यर (कर्णधार), मार्कस स्टॉइनिस, नेहाल वढेरा, ग्लेन मॅक्सवेल, शशांक सिंह, मार्को जेनसन, अर्शदीप सिंह, लॉकी फर्ग्यूसन, युजवेंद्र चहल