चंदीगढ : कोलकाता नाईट रायडर्सच्या गोलंदाजी आणि प्रभावी क्षेत्ररक्षणापुढं पंजाब किंग्जच्या फलंदाजांनी नांगी टाकली. केकेआरच्या गोलंदाजांनी पंजाबच्या फलंदाजांना कमबॅक करुन दिलं नाही. केकेआरनं पंजाब किंग्जला 16 ओव्हरमध्येच 111 धावांवर पंजाब किंग्जला रोखलं. पंजाब किंग्जचे फलंदाज चुकीचे फटके मारुन बाद झाले. हर्षित राणा यानं 3 विकेट घेतल्या, वरुण चक्रवर्ती 2, सुनील नरेन यानं 2 , वैभव अरोरा आणि एनरिच नोर्तजे यानं प्रत्येकी एक विकेट घेतली. तर, पंजाबकडून सर्वाधिक धावा प्रभासिमरन सिंह यानं केल्या. प्रभासिमरन सिंह यानं 30 तर प्रियांश आर्य यानं 22 धावा केल्या.
पंजाब किंग्जचा कॅप्टन श्रेयस अय्यर यानं टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, हा निर्णय संघासाठी फायदेशीर ठरला नाही. पंजाबचा संघ 16 ओव्हरमध्ये म्हणजेच केवळ 93 बॉलमध्ये बाद झाला. पंजाबनं 111 धावा केल्या, म्हणजेच विजयासाठी केकेआरला 112 धावांची गरज आहे.
पंजाब किंग्जच्या डावाची सुरुवात प्रियांश आर्य आणि प्रभासिमरन सिंह यांनी चांगली सुरुवात केली होती. मात्र, हर्षित राणा यानं प्रियांश आर्य याला 22 धावांवर बाद केल्यानंतर पंजाबला धक्के बसत राहिले.
पंजाबचा कॅप्टन श्रेयस अय्यर आज एकही न करु शकला नाही. हर्षित राणाच्या एकाच ओव्हरमध्ये पंजाबला हे दोन धक्के बसले यातून ते सावरु शकले नाहीत. जोश इंग्लिस आणि ग्लेन मॅक्सवेल या दोघांची विकेट वरुण चक्रवर्ती यानं काढली. प्रभा सिमरन सिंह हा 30 धावा करुन बाद झाला. यानंतर नवव्या ओव्हरमध्ये नेहाल वढेरा 10 दावा करुन बाद झाला. यानंतर त्यांची फलंदाजी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणं कोसळली.
दरम्यान, कोलकाता नाईट रायडर्सच्या गोलंदाजांची दमदार कामगिरी सुरुच आहे. चेन्नईला 100 धावांच्या आत रोखणाऱ्या गोलंदाजांनी पंजाब किंग्जला देखील मोठी धावसंख्या उभारु दिली नाही. आता केकेआर पंजाबवर विजय मिळवणार का या कडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. पंजाबचे गोलंदाज केकेआरला 112 धावा करण्यापासून रोखू शकतात का हे काही वेळातच समोर येईल.
पंजाब किंग्स : प्रियांश आर्य, प्रभसिमरन सिंह (विकेटकीपर), श्रेयस अय्यर (कप्तान), नेहल वढेरा, जोश इंग्लिस, शशांक सिंह, ग्लेन मैक्सवेल, मार्को जानसन, जेवियर बार्टलेट, अर्शदीप सिंह, युजवेंद्र चहल