PBKS vs DC IPL 2024 : शिखर धवनच्या पंजाब संघानं यंदाच्या आयपीएलची सुरुवात विजयानं केली आहे. कमबॅक करणाऱ्या ऋषभ पंतला पराभवाचा धक्का बसला आहे.  सॅम करन आणि लियाम लिव्हिंगस्टोनच्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर पंजाबनं दिल्लीचा पराभव केला आहे. पंजाबनं दिल्लीचा चार विकेटनं पराभव केला. दिल्लीनं प्रथम फलंदाजी करताना 174 धावांपर्यंत मजल मारली होती. हे आव्हान पंजाबनं अखेरच्या षटकात सहा विकेटच्या मोबदल्यात पार केले. पंजाबसाठी सॅम करन यानं 63 धावांची शानदार खेळी केली. तर लिव्हिंगस्टोन यानं 21 चेंडूत नाबाद 38 धावांचं योगदान दिलं.  


सॅम करनने विजय खेचून आणला - 


सॅम करन यानं अष्टपैलू खेळीचं प्रदर्शन केले. सॅम करन यानं फलंदाजीमध्ये शानदार कामगिरी केली. सॅम करन यानं 47 चेंडूमध्ये 63 धावांची मॅच विनिंग खेळी केली. त्यानं आपल्या खेळीमध्ये एक षटकार आणि सहा चौकारांचा पाऊस पाडला. सॅम करन यानं पंजाबसाठी विजय खेचून आणला. त्याला लियाम लिव्हिंगस्टोन यानं चांगली साथ दिली. लिव्हिंगस्टोन यानं 21 चेंडूमध्ये नाबाद 38 धावांची खेळी केली. यामद्ये तीन षटकार आणि दोन चौकारांचा समावेश आहे. 




चांगल्या सुरुवातीनंतरही घसरण - 


दिल्लीने दिलेल्या 175 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबची सुरुवात अतिशय निराशाजनक झाली. कर्णधार शिखर धवन 22 धावा काढून परतला. तर दुसरा सलामी फलंदाज जॉनी बेअरस्टो 9 धावा काढून बाद झाला. प्रभसिमरन यानं प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, पण त्याला कुलदीप यादवनं तंबूत धाडलं. शिखर धवन यानं 16 चेंडूमध्ये 22 धावांची खेळी केली. यामध्ये चार चौकारांचा समावेश आहे. तर जॉनी बेअरस्टो यानं 3 चेंडूमध्ये दोन चौकारांच्या मदतीने 9 धावा केल्या. तो दुर्दैवीरित्या धावबाद झाला. प्रभसिमरन यानं 17 चेंडूत 26 धावांची खेळी केली. यामध्ये पाच चौकारांचा समावेश आहे. जितेश शर्मा यालाही मोठी खेळी करता आली नाही. उपकर्णधार जितेश शर्मा 9 चेंडूत 9 धावा काढून बाद झाला. 


षटकार मारत विजय मिळवून दिला - 


जितेश शर्मा बाद झाल्यानंतर सॅम करन यानं लियाम लिव्हिंगस्टोनच्या साथीने डावाला आकार दिला. दोघांनी दिल्लीच्या गोलंदाजांचा समाचार घेतला.  ईशांत शर्मा दुखापतग्रस्त झाल्यामुळे दिल्लीची गोलंदाजी कमकुवत झाली होती. त्याचा फायदा सॅम करन आणि लिव्हिंगस्टोन यांनी घेतला. दोघांनी 42 चेंडूमध्ये 67 धावांची भागिदारी केली. पंजाबसाठी ही सर्वात मोठी भागिदारी ठरली.  सॅम करन आणि शशांक सिंह लागोपाठ बाद झाल्याने सामन्यात रंगत येईल की काय असे झालं होतं. पण लियाम लिव्हिंगस्टोन यानं षटकार मारत विजय मिळवून दिला.




दिल्लीची गोलंदाजी खराब - 


खलील अहमद महागडा ठरला. त्यानं 4 षटकात 43 धावा खर्च केल्या. खलील अहमद याने दोन विकेट घेतल्या. इशांत शर्मा याने 2 षटकात एक विकेट घेतली. कुलदीप यादव यानं भेदक मारा केला. त्यानं 4 षटकात 20 धावांच्या मोबदल्यात दोन विकेट घेतल्या. अक्षर पटेल यानं भेदक मारा केला, पण त्याला विकेट मिळाली नाही. मिचेल मार्श यानं चार षटकात 52 धावा खर्च केल्या.