बंगळुरु : आयपीएलमध्ये आज दहावी मॅच आरसीबी (Royal Challengers Bengaluru) आणि केकेआर (Kolkata Knight Riders) यांच्यात होणार आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं यंदाच्या हंगामात दोन मॅच खेळल्या आहेत. त्यापैकी पहिल्या मॅचमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.तर,चेन्नई विरुद्ध पराभव झाल्यानंतर पंजाब विरुद्धच्या मॅचमध्ये बंगळुरुनं विजय मिळवला आहे. दुसरीकडे कोलकाता नाईट रायडर्सनं पहिल्या मॅचमध्ये सनरायजर्स हैदराबादला पराभूत केलं होतं. आज कोलकाताची दुसरी लढत आहे. कोलकाता आणि आरसीबीसाठी नेमके कोणते खेळाडू गेमचेंजर ठरतील हे पाहणं महत्त्वाचं आहे.
आंद्रे रसेल
आंद्रे रसेल त्याच्या आक्रमक बॅटिंगसाठी प्रसिद्ध आहे. रसेलनं गेल्या मॅचमध्ये नाबाद 64 धावांची खेळी केली होती. त्यावेळी त्यानं 3 चौकार आणि 7 सिक्स मारले होते.आंद्रे रसेलनं आतापर्यंत आयपीएलमध्ये 113 मॅच खेळल्या आहेत. रसेलनं आतापर्यंत आयपीएलमध्ये 2326 धावा केल्या होत्या. रसेलची सर्वोत्तम धावसंख्या 88 इतकी आहे. रसेल आरसीबी विरोधात देखील चांगली कामगिरी करु शकतो. रसेल मॅच फिनिशरच्या भूमिकेत कोलकातासाठी चांगली कामगिरी करु शकतो.
विराट कोहली
आरसीबीचा माजी कर्णधार आणि संघातील महत्त्वाचा खेळाडू विराट कोहली आक्रमक फलंदाजीसाठी प्रसिद्ध आहे.परिस्थितीशी जुळवून घेऊन क्रिकेट खेळण्यात त्याचा हातखंडा आहे. चेन्नई सुपर किंग्ज विरुद्धच्या मॅचमध्ये विराटला मोठी धावसंख्या उभारता आली नव्हती. मात्र, पंजाब किंग्ज विरुद्धच्या मॅचमध्ये त्यानं 77 धावांची खेळी केली होती. विराटनं पहिल्या दोन मॅचमध्ये 98 धावा केल्या आहेत. विराट कोहलीवर आरसीबीची मोठी मदार असेल. होम ग्राऊंडवर खेळणार असल्यानं विराट कोहलीला बंगळुरुच्या चाहत्यांचा पाठिंबा देखील मिळेल.
फाफ डु प्लेसिस
आरसीबीचा कॅप्टन म्हणून फाफ डु प्लेसिसवर अतिरिक्त जबाबदारी आहे. फाफ डुप्लेसिस 132 मॅचेसमध्ये 4171 धावा केल्या आहेत. डुप्लेसिसची आयपीएलमधील सर्वाधिक धावसंख्या 96 आहे. पंजाब किंग्ज विरुद्धच्या मॅचमध्ये तो मोठी धावसंख्या उभारू शकला नव्हता. तो 3 रन करुन बाद झाला होता. दुसरीकडे फाफ डु प्लेसिसनं चेन्नई सुपर किंग्ज विरुद्धच्या मॅचमध्ये 35 धावांची खेळी केली होती. मात्र, आरसीबीला त्या मॅचमध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता.
दरम्यान, आरसीबीला कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध गेल्या पाच मॅचमध्ये विजय मिळवता आलेला नाही. त्यामुळं आरसीबी होम ग्राऊंडवर दुसऱ्या विजयासह कोलकाताला पराभूत करण्यासाठी प्रयत्न करेल. तर, दुसरीकडे कोलकाता नाईट रायडर्स दुसऱ्या मॅचमध्ये विजय मिळवून गुणतालिकेत चौथं स्थान पटकावू शकतात.
संबंधित बातम्या :
रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्यासोबत फोटोत दिसणारी मिस्ट्री गर्ल कोण? जाणून घ्या