CSK vs DC: आज दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यामध्ये आमनासामना होणार आहे. आजच्या दिवसातील हा दुसरा सामना असेल. सायंकाळी साडेसात वाजता दिल्ली आणि चेन्नई यांच्यातील लढतीला सुरुवात होणार आहे. ऋतुराजच्या नेतृत्वातील चेन्नईने लागोपाठ दोन सामन्यात विजय मिळवत शानदार सुरुवात केली. दुसरीकडे ऋषभ पंतच्या दिल्लीला लागोपाठ दोन सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे दिल्लीला पहिल्या विजयाची अद्याप प्रतीक्षाच आहे. दिल्लीच्या फलंदाजांचा फॉर्म अद्याप परतलेला नाही, अशा स्थितीतमध्ये दिल्ली चेन्नईच्या आक्रमणाचा कसा सामना करणार? याकडे चाहत्यांच्या नजरा लागल्या आहेत. 


आजच्या सामन्यात दिल्लीच्या ताफ्यात पृथ्वी शॉचे कमबॅक होण्याची शक्यता आहे. दिल्लीला चेन्नईविरोधात मागील चारही सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. आयपीएलमधील मागील चार सामन्यात चेन्नईने दिल्लीचा दारुण पराभव केला आहे. त्यामुळे यंदाच्या हंगामात दिल्ली चेन्नईचा हिशोब चुकता करण्यासाठी मैदानात उतरेल. सीएसकेने ‘अनकॅप्ड’ समीर रिझवी याला 8.40 कोटी रुपयांमध्ये आपल्या ताफ्यात घेतले. समीर रिझवीने पदार्पणाच्या सामन्यात शानदार खेळी केली. राशीद खानसारख्या अनुभवी गोलंदाजाला दोन खणखणीत षटकार ठोकले. समीर रिझवीमुळे चेन्नईची फलंदाजी आणखी मजबूत झाली आहे. दुसरीकडे दिल्लीच्या रिकी भुई याला अद्याप लौकिकास साजेशी फलंदाजी करता आली नाही. नुकत्याच झालेल्या रणजी चषकात रिकी भुई यानं 902 धावांचा पाऊस पाडला होता.  


पृथ्वी शॉ याला संधी मिळणार का ?


रणजी चषकाच्या दुसऱ्या टप्प्यात पृथ्वी शॉ यानं कमबॅक केले होते, पण रिकी पाँटिंग याच्या फिटनेस चाचणीमध्ये तो अपयशी ठरला. पण दिल्लीच्या ड्रेसिंग रुममध्ये रिकी भुई आणि पृथ्वी शॉ यांच्यापैकी एकाला संधी मिळेल, हे माहितेय. चेन्नईविरोधात पृथ्वी शॉ याला संधी मिळण्याची शक्यता जास्त वर्तवण्यात येतेय. डेविड वॉर्नर अद्याप फॉर्मात परतला नाही, त्याशिवाय पंतही अद्याप जुन्या रंगात दिसलेला नाही. त्यामुळे पृथ्वी शॉ दिल्लीच्या ताफ्यात परतल्यास दिल्लीच्या फलंदाजीला मजबूती मिळेल. मुस्तफिजुर रहमान, दीपक चाहर, माथिशा पाथिराना आणि रवींद्र जाडेजा यासारख्या गोलंदाजांचा सामना करण्यास दिल्लीचं फलंदाज तयार होतील.  


दोन्ही संघाची संभाव्य प्लेईंग 11


दिल्ली कॅपिटल्सची संभाव्य प्लेईंग 11 : ऋषभ पंत (कर्णधार), डेविड वॉर्नर, मिचेल मार्श, रिकी भुई, ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, सुमित कुमार, एनरिक नॉर्खिया, कुलदीप यादव, खलील अहमद, मुकेश कुमार


चेन्नई सुपर किंग्सची प्लेईंग XI: ऋतुराज गायकवाड़ (कर्णधार), रचिन रवींद्र, अजिंक्य रहाणे, डेरिल मिचेल, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, समीर रिजवी, एमएस धोनी (विकेटकीपर), दीपक चाहर, तुषार देशपांडे आणि मुस्तफिजुर रहमान



हेड टू हेड स्थिती कशी आहे ?


दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यामध्ये आयपीएलचे 29 सामने झाले आहेत. यामध्ये चेन्नईने 19 वेळा विजय मिळवलाय, तर दिल्लीला फक्त 10 सामन्यात विजय मिळवता आला आहे. म्हणजेच, आकड्यावरुन सध्या तरी चेन्नईचं पारडं जड असल्याचे दिसतेय.