RCB vs DC IPL 2023 Match 20 : वैशाक विजयकुमार याच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर आरसीबीने दिल्लीचा 23 धावांनी पराभव केला. आरसीबीने दिलेल्या 175 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीचा संघ 151 धावांपर्यंत मजल मारु शकला. आरसीबीच्या गोलंदाजांनी अचूक टप्प्यावर मारा करत दिल्लीच्या फलंदाजांना तंबूत धाडले. पावरप्लेमध्ये दिल्लीचे चार फलंदाज बाद झाले होते. मनिष पांडेच्या अर्धशतकाच्या बळावर दिल्लीने 150 धावसंख्या पार केली. दिल्लीचा हा सलग पाचवा पराभव होय.. दिल्लीला अद्याप विजयाचे खाते उघडता आले नाही. वैशाक विजयकुमार याने आयपीएल पदार्पणात तीन विकेट घेण्याचा पराक्रम केला.


175 धावांचा पाठलाग करताना दिल्लीची सुरुवात निराशाजनक झाली. अवघ्या एका धावेवर पृथ्वी शॉ धावबाद झाला.. त्याला एकही धाव काढता आली नाही. त्यानंतर मिचेल मार्शही गोल्डन डकचा शिकार झाला.. एका धावेवर दिल्लीच दोन फलंदाज तंबूत परतले होते.  मिचेल मार्श याला  वेन पर्नेल याने तंबूत धाडले.  त्यानंतर संघाची धावसंख्या तीन झाल्यानंतर यश धुलही तंबूत परतला. त्याला मोहम्मद सिराज याने बाद केले. दिल्लीची अवस्था बिकट झाल्यानंतर मनिष पांडे आणि डेविड वॉर्नर यांनी डाव सावरला. दोन्ही अनुभवी फलंदाजांनी संघाची धावसंख्या हालती ठेवली. पण आरसीबीकडून पदार्पण करणाऱ्या वौशाक याने डेविड वॉर्नर याला बाद केले. सहा षटकात 32 धावांच्या मोबदल्यात दिल्लीने चार विकेट गमावल्या होत्या. 


आघाडीचे फलंदाज बाद झाल्यानंतर मनिष पांडे याने दुसऱ्या बाजूला दमदार प्रदर्शन केले. मनिष पांडे याने चौकार षटकारांचा पाऊस पाडला. त्याने अर्धशतकी खेळी करत दिल्लीला विजयाच्या आशा पल्लवीत केल्या. पण पांडेला दुसऱ्या बाजूने साथ मिळाली नाही. 50 धावांवर मनिष पांडे बाद झाला. त्यानंतर अभिषेक परेल पाच धावा काढून तंबूत परतला.  अक्षर पटेल यालाही मोठी खेळी करता आली नाही. तो  14 चेंडूत 21 धावांवर बाद झाला. मनिष पांडे याने 38 चेंडूत अर्धशतकी खेळी केली.  दिल्लीने 98 धावांत सात विकेट गमावल्या होत्या. आरसीबीकडे सामना झुकला होता. अमन खान याने अखेरीस दमदार फलंदाजी करत संघाची धावसंख्या 150 च्या पार नेली. आरसीबीकडून वैशाक विजयकुमार याने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. तर  मोहम्मद सिराज याने 2  विकेट घेतल्या.  






विराट कोहलीचे अर्धशतक, आरसीबीची 174 धावांपर्यंत मजल 


दरम्यान, विराट कोहलीच्या अर्धशतकाच्या बळावर आरसीबीने निर्धारित 20 षटकात 174 धावांपर्यंत मजल मारली. आरसीबीची फलंदाजी फिरकीसमोर ढेपाळली. दिल्लीच्या फिरकी गोलंदाजांनी 11 षटकात फक्त 77  धावां खर्च केला अन् चार विकेट घेतल्या. 


विराट कोहलीचे अर्धशतक


एम. चिन्नास्वामी स्टेडिअमवर विराट कोहलीची बॅट पुन्हा एकदा तळपली. विराट कोहलीने 34 चेंडूत अर्धशतकी खेळी केली. या खेळीत विराट कोहलीने एक षटकार आणि सहा चौकार लगावले. विराट कोहलीचे आयपीएलच्या सोळाव्या हंगमातील तिसरे अर्धशतक होय.. चार डावात विराट कोहलीने तीन अर्धशतके झळकावली आहेत. विराट कोहली याने यंदाच्या हंगमात चार डावात 200 धावांचा पल्ला पार केलाय. त्याशिवाय चिन्नास्वामी स्टेडिअमवर विराट कोहलीने २५०० धावांचा पल्ला पार केला आहे. एकाच मैदानावर इतक्या धावा करणारा विराट कोहली एकमेव फलंदाज आहे. आजच्या सामन्यात विराट कोहलीने पहिल्या चेंडूपासूनच आक्रमक रुप धारण केले होते. फाफ डु प्लेसिससोबत विराट कोहलीने ४.४ षटकात ४२ धावांची भागिदारी केली. त्यानंतर लोमरोर याच्यासोबतही ४७ धावांची भागिदारी केली. 


मॅक्सवेल-फाफ-लोमरोरची छोटेखानी खेळी - 



कर्णधार फाफ डु प्लेसिस याला चांगला सूर गवसला होता. फाफ याने सुरुवातीपासूनच आक्रमक रुप धारण केले होते. फाफ याने विराट कोहलीसोबत ४२ धावांची भागिदारी केली. फाफ याने १६  चेंडूत २२ धावांची खेळी केली. यामध्ये एक षटकार आणि तीन चौकारांचा समावेश आहे. अमन खान याने फाफ याचा अप्रतिम झेल घेतला. फाफ बाद झाल्यानंतर महिपाल लोमरोर याने विराट कोहलीची साथ दिली. लोमरोर याने २६ धावांची छोटेखानी खेळी केली. यामध्ये त्याने दोन षटकार लगावले. मॅक्सवेलही धावसंख्या वाढवण्याच्या प्रयत्नात बाद झाला.. त्याला 24 धावांचे योगदान देता आले. १४ चेंडूत तीन षटकारासह २४ धावांचे योगदान दिले. कुलदीप यादव याने मॅक्सवेलचा अडथळा दूर केला. 


चांगल्या सुरुवातीनंतर आरसीबीची फलंदाजी ढासळली - 


विराट कोहली याने दमदार अर्धशतक करत आरसीबीला चांगली सुरुवात करुन दिली. पण त्यानंतर आरसीबीची फलंदाजी ढासळली. एकापाठोपाठ एक विकेट गमावल्या. 132 धावसंख्येवर आरसीबीने लागोपाठ तीन विकेट गमावल्या. हर्षल पटेल, ग्लेन मॅक्सवेल आणि दिनेश कार्तिक एकापाठोपाठ एक बाद झाले. ग्लेन मॅक्सवेल आणि महिपाल लोमरोर यांना चांगली सुरुवात मिळाली पण मोठी खेळी करण्यात अपयश आले. तर हर्षल पटेल आणि दिनेश कार्तिक अपयशी ठरले. हर्षल पटेल सहा धावा काढून तंबूत परतला तर कार्तिकला एकही धाव काढता आली नाही.


रावत-शाहबाजची फिनिशिंग -
लागोपाठ विकेट पडल्यानंतर अनुज रावत आणि शाहबाज यांनी दमदार खेळी केली. दोघांनीही अखेरच्या ३४ चेंडूत विकेट न जाऊ देता ४२ धावांची भागिदारी केली. यामध्ये शाहबाद अहमद याने १२ चेंडूत २० धावांची खेळी केली. तर अनुज रावत याने २२ चेंडूत १५ धावांचे योगदान दिले. 


कुलदीप यादव -मिचेल मार्श यांचा भेदक मारा - 


कुलदीप यादव आणि मिचेल मार्श यांनी भेदक मारा करत आरसीबीच्या फलंदाजीला खिंडार पाडले. मिचेल मार्श याने दोन षटकात दोन विकेट घेतल्या. तर कुलदीप यादव याने चार षटकात २३ धावांच्या मोबदल्यात दोन विकेट घेतल्या. कुलदीप यादव याने एकाच षटकात मॅक्सवेल आणि कार्तिक याला बाद करत आरसीबीच्या मोठ्या धावसंख्येच्या स्वप्नावर पाणी फेरले.  ललीत यादव याने चार षटकात २९ धावांच्या मोबदल्यात एक विकेट घेतली. तर अक्षर पटेल याने तीन षटकात २५ धावांच्या मोबदल्यात एक विकेट घेतली.