अटीतटीच्या लढतीत पंजाबने राजस्थानचा पाच धावांनी पराभव केला. शिखर धवन याच्या अर्धशतकानंतर नॅथन एलिस याने केलेल्या भेदक माऱ्याच्या जोरावर पंजाबने राजस्थानचा पराभव केला. पंजाबने दिलेल्या १९८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानचा संघाने १९२ धावांपर्यंत मजल मारली. शिमरोन हेटमायर आणि जुरेल यांनी विजयासाठी अखेरपर्यंत प्रयत्न केले, पण सॅम करन याने भेदक मारा करत पंजाबला विजय मिळवून दिला.



राजस्थानने सलामी बदलली -


१९८ धावांचा पाठलाग करताना राजस्थान संघाने सलामीची जोडी बदलली. विस्फोटक फलंदाज जोस बटलर याला सलामीला पाठवले नाही. त्याजागी आर. अश्विन सलामीला उतरला होता. अश्विन आणि यशस्वी जायस्वाल यांनी सलामी दिली. पण राजस्थानचा हा डाव यशस्वी ठरला नाही. अश्विनला एकही धाव काढता आली नाही. अश्विन चार चेंडू खेळून शून्यावर बाद झाला. त्याशिवाय यशस्वी जायस्वाल याने आठ चेंडूत ११ धावा काढल्या. तर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या बटलर याने १९ धावांचे योगदान दिले. 


संजूची विस्फोटक खेळी -


राजस्थानच कर्णधार संजू सॅमसन याने धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न केला. संजू सॅमसन याने २५ चेंडूत ४२ धावांची खेळी केली. संजूने या खेळीदरम्यान एक षटकार आणि पाच चौकार लगावले. जोस बटलर आणि यशस्वी झटपट बाद झाल्यानंतर संजू सॅमसन याने धावसंख्या वाढवण्याची जबाबदारी पार पाडली. पण एलिसच्या चेंडूवर मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात संजू बाद झाला.


जुरेल-शिमरोन हेटमायरचा अयशस्वी प्रयत्न -
शिमरोन हेटमायर याने केलेल्या जबरदस्त फलंदाजीमुळे सामना अखेरच्या चेंडूपर्यंत गेला. हेटमायर याने जुरेलसोबत  राजस्थानच्या विजयाच्या आशा उंचावल्या होत्या. पण हेटमार बाद झाल्यानंतर पंजाबने सामन्यात पुनरागमन केले. शिमरोन हेटमारय याने १८ चेंडूत ३६ धावा केल्या. या खेळीदरम्यान त्याने तीन षटकार आणि एक चौकार लगावला. मोक्याच्या क्षणी जुरेल आणि हेटमायर यांनी अर्धशतकी भागिदारी केली. पण संघाला विजय मिळवून देऊ शकले नाहीत. जुरेल याने १५ चेंडूत ३२ धावांची खेळी केली. या खेळीत त्याने दोन षटकार आणि तीन चौकार लगावले. 


नॅथन एलिसचा जबराट स्पेल - 


पंजाबचा वेगवान गोलंदाज नॅथन एलिस याने जबरदस्त गोलंदाजी केली. एलिसच्या गोलंदाजीपुढे राजस्थानच्या दिग्गज फलंदाजांनी गुडघे टेकले. एलिस याने चार षटकात अवघ्या ३० धावा खर्च केल्या. एलिस याने चार विकेट घेत पंजाबच्या विजयाच्या आशा उंचावल्या. एलिसने भन्नाट फॉर्मात असलेल्या जोस बटलराचा अडथळा दूर केला. एलिसने जोस बटलरशिवाय संजू सॅमसन, देवदत्त पडिक्कल आणि रियान पराग यांना तंबूचा रस्ता दाखवला. त्याशिवय अर्शदीप सिंह यानेही भेदक मारा केला. अर्शदीप याने दोन विकेट घेतल्या.  


दरम्यान, शिखर धवनची कर्णधारपदाला साजेशी खेळी आणि युवा प्रभसिमरन याची वादळी अर्धशतकाच्या जोरावर पंजाबने निर्धारित 20 षटकात चार विकेटच्या मोबदल्यात 197 धावांपर्यंत  मजल मारली. शिखर धवन याने 86 तर प्रभसिमरन याने 56 धावांची खेळी केली. राजस्थानकडून जेसन होल्डर याने सर्वाधिक दोन विकेट घेतल्या. 


शिखरची कर्णधारपदाला साजेशी खेळी -


शिखर धवन याने कर्णधारपदाला साजेशी खेळी केली. शिखर धवन याने ५६ चेंडूत ८५ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान धवन याने ९ चौकार आणि तीन षटकार लगावले. शिखर धवन याने सुरुवातीला संयमी फलंदाजी केली. शिखर धवन याने सुरुवातीला एकेरी आणि दुहेरी धावसंख्यावर भर दिला. शिखर धवन याने सुरुवातीला तीस चेंडूत फक्त तीस धावांची खेळी केली. होती. पण जम बसल्यानंतर शिखर धवन याने राजस्थानच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. विराट कोहली आणि डेविड वॉर्नर यांच्यानंतर आयपीएलमध्ये अर्धशतकचे अर्धशतक पूर्ण करणारा शिखर धवन तिसरा खेळाडू ठरला. 


युवा प्रभसिमरनचे वादळी अर्धशतक - 
सलामी फलंदाज प्रभसिमरन याने राजस्थानविरोधात अर्धशथकी खेळी केली. त्याने अवघ्या ३४ चेंडूत ६० धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने तीन षटकार आणि सात चौकार लगाले. प्रभसिमरन याने राजस्थानच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. 


प्रभसिमरनचे वादळ अन् शिखरचा संयम - 


नाणेफेक गमावल्यानंतर शिखर धवन आणि प्रभसिमरन यांनी पंजाबला दणक्यात सुरुवात करुन दिली. दोघांनी नऊ षटकात ९० धावांची सलामी दिली. या भागिदारीमध्ये शिखर धवन याने संयमी फलंदाजी केली. तर प्रभसिमरन याने धावांचा पाऊस पाडला. ९० धावांमध्ये प्रभसिमरन याचा ६० धावांचा वाटा होता. तर शिखर धवनचा फक्त २४ धावांचा वाटा राहिला. शिखऱ धवन याने एकेरी दुहेरी धावसंख्या घेत प्रभसिमरनला स्टाईक दिली. 


शिखरचा फटका थेट राजपक्षे दुखापतग्रस्त- 
शिखर धवन याने मारलेल्या फटक्यामुळे भानुका राजपक्षे दुखापतग्रस्त झाला. शिखर धवन याने समोर फटका मारला... त्यावेळी नॉनस्ट्राइकला असलेल्या भानुका राजपक्षे याला चेंडू लागला. यामुळे राजपक्षे दुखापतग्रस्त झाला. यामुळे त्याला फलंदाजीसोडून बाहेर जावे लागले. राजपक्षेची दुखापत किती गंभीर आहे, याबाबत कोणताही माहिती मिळालेली नाही. पण राजपक्षे मधल्या षटकात पंजाबसाठी धावांचा पाऊस पाडत होता. गेल्या हंगमातही त्याने पंजाबसाठी खूप धावा जमवल्या होत्या. राजपक्षेची दुखापत गंभीर असल्यास हा पंजाबला मोठा धक्का मानला जाईल. 


जितेश शर्मा - शिखरची दमदार भागिदारी - 
शिखर धवन आणि जितेश शर्मा यांनी ६६ धावांची महत्वाची भागिदारी केली. जितेश शर्मा याने १६चेंडूत २७ धावांचे योगदान दिले. तर या भागिदारीत शिखर धवन याने ३६ धावांचे योगदान दिले. जितेश शर्मा आणि शिखर धवन यांनी मोठ्या धावसंख्येचा पाया रचला.


चहल- केएम आसिफचे अर्धशतक, अश्विनचा भेदक मारा - 


युजवेंद्र चहल आज महागडा ठरला. चहल याने चार षटकात तब्बल ५० धावा खर्च केल्या. केएम आसिफ यानेही खराब गोलंदाजी केली. आसिफने चार षटकात ५० पेक्षा जास्त धावा खर्च केल्या. त्याशिवाय ट्रेंट बोल्ट यानेही चार षटकात ३८ धावा खर्च केल्या. अश्विन याने अचूक टप्प्यावर मारा केला. अश्विन याने चार षटकात फक्त २५ धावा खऱ्च केल्या.