KKR vs SRH Key Battles : ईडन गार्डन्स मैदानावर आज कोलकाता आणि हैदराबाद यांच्यात लढत होणार आहे. हैदराबादचे नेतृत्व मारक्रम करत आहे तर कोलकात्याची धुरा नीतीश राणा याच्या खांद्यावर आहे. आजच्या लढतीत धावांचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. आजच्या सामन्यात काही लढतीकडे विशेष लक्ष असेल... चेंडू आणि बॅटच्या या लढाईत कोण बाजी मारणार ? याकडे क्रीडा विश्वाचे लक्ष लागलेय. कधी कोलकात्याचा फलंदाज वरचढ राहिलाय तर कधी हैदराबादच्या गोलंदाजाने आपली कामगिरी चोख बजावली आहे. पाहूयात आज कोणत्या तीन लढतीकडे सर्वांचे लक्ष असेल... 


राहुल त्रिपाठी Vs सुनील नारायण :


कोलकाताचा स्टार फिरकीपटू सुनील नारायण सध्या भन्नाट फॉर्मात आहे. नारायण हैदराबादविरोधातही भेदक मारा करु शकतो. सुनील नारायण आणि राहुल त्रिपाठी यांच्यातील सामना रंगतदार होईल. आतापर्यंत या दोघामधील सामना पाहण्यासारखा झाला आहे. या लढतीत त्रिपाठी वरचढ झाल्याचे दिसतोय. राहुल त्रिपाठी याने सुनील नारायणच्या 48 चेंडूचा सामना केला. यामध्ये त्याने 150 च्या स्ट्राईक रेटने 71 धावा वसूल केल्या आहेत. सुनील नारायण याला राहुल त्रिपाठीला एकाही बाद करता आलेले नाही. सुनील नारायण आज त्रिपाठीविरोधातील आपली कामगिरी सुधारण्याचा प्रयत्न करेल. 


आंद्रे रसेल Vs भुवनेश्वर कुमार : 


कोलकात्याचा विस्फोटक फलंदाज आंद्रे रसेल याने भुवनेश्वर कुमारविरोधात धावांचा पाऊस पाडलाय. रसेल याने भुवनेश्वरच्या 31 चेंडूत 63 धावांचा पाऊस पाडलाय. यादरम्यान भुवनेश्वरने एकवेळा रसेल याला तंबूचा रस्ता दाखवलाय. आज ही लढत रंगतदार होण्याची शक्यता आहे. रसेल सध्या लयीत नाही, पण तो ईडन गार्डनवर चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडू शकतो. 


एडन मारक्रम Vs वरुण चक्रवर्ती : 


सनरायजर्स हैदराबादचा कर्णधार एडन मारक्रम याची बॅट वरुण चक्रवर्तीच्या विरोधात खूप चालते. मारक्रम याने चक्रवर्तीविरोधात धावांचा पाऊस पाडलाय. मारक्रम याने चक्रवर्तीच्या 20 चेंडूवर 40 धावा चोपल्या आहेत.  


KKR vs SRH Match 19 Preview : कोलकाता आणि हैदराबाद आमने-सामने


कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आणि सनरायजर्स हैदराबाद (SRH) यांच्यात आज कोलकाता (Kolkata) येथे रणसंग्राम पाहायला मिळणार आहे. दोन्ही संघांचा आज चौथा सामना असेल. यंदाच्या मोसमात खेळलेल्या तीन सामन्यांपैकी कोलकाता संघाने दोन सामने जिंकले तर एका सामन्यात त्यांचा पराभव झाला आहे. तर, दुसरीकडे हैदराबाद संघाला तीन सामन्यांपैकी एकाच सामन्यात विजय मिळवता आला आहे.