IPL 2023 New Rules : बहुप्रतिक्षित इंडियन प्रीमियर लीगला (IPL 2023) आजपासून सुरुवात होणार आहे. यंदाच्या हंगामातील पहिला सामना आज अहमदाबादमध्ये पार पडणार आहे. चेन्नई सुपर किंग्स (CSK) विरुद्ध गुजरात टायटन्स (GT) विरुद्धच्या सामन्याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. सर्वत्र आयपीएलची क्रेझ पाहायला मिळत आहे. यंदाचं आयपीएल आणखी खास असणार आहे कारण, यावेळी नवीन नियम लागू करण्यात आले आहेत. यंदा संघामध्ये 11 ऐवजी 12 खेळाडू असणार आहे. यासारख्या पाच नवीन नियमांमुळे यंदाचा हंगाम आणखी रोमाचंक ठरणार आहे.
1. इम्पॅक्ट प्लेअर नियम, संघामध्ये 11 ऐवजी 12 खेळाडू ( What is Impact Player Rule)
यंदाच्या आयपीएलमध्ये सर्वात महत्त्वाचा इम्पॅक्ट प्लेअर नियम लागू करण्यात आला आहे. यानुसार, संघात 11 ऐवजी 12 प्लेअर असतील. मात्र, एका संघातून 12 प्लेअर खेळतील असा याचा अर्थ नाही. इम्पॅक्ट प्लेअर नियमानुसार, संघाला सामन्यादरम्यान संघातील एका खेळाडूला बदलून त्याऐवजी दुसरा खेळाडू खेळवता येईल. दरम्यान विदेशी खेळाडूचा इम्पॅक्ट प्लेअर म्हणून वापर करता येणार नाही.
कोणताही संघ 14 व्या षटकाच्या आधी इम्पॅक्ट प्लेअर वापरू शकतो. ओव्हर संपल्यावर किंवा खेळाडू बाद झाल्यावर किंवा एखादा खेळाडू जखमी झाल्यास इम्पॅक्ट प्लेयर नियम वापरून खेळाडू बदलला जाऊ शकतो. नाणेफेकीवेळी संघाच्या कर्णधाराला चार इम्पॅक्ट प्लेअर खेळाडूंची नावे द्यावी लागतील. त्यातील एकाचा इम्पॅक्ट प्लेअर म्हणून वापर करता येईल.
2. नाणेफेकीनंतर प्लेईंग 11 ठरणार
आतापर्यंत कर्णधारांनी नाणेफेक करण्यापूर्वी प्लेईंग 11 सांगण्याचा नियम होता. पण आता नाणेफेकनंतर कर्णधाराला प्लेईंग इलेव्हनची घोषणा करता येणार आहे. यामुळे नाणेफेकीच्या निकालाच्या आधारे कर्णधाराला प्लेइंग इलेव्हनची घोषणा करता येईल.
3. वाईड-नो बॉलसाठी DRS असेल
नुकत्याच संपलेल्या महिला प्रीमियर लीगमध्ये संघ वाइड आणि नो बॉलसाठी डीआरएस वापरण्यात आलं होतं. आता हा नियम आयपीएलमध्येही लागू होणार आहे. पंचांच्या निर्णयाशी सहमत नसल्यास, फलंदाजी आणि गोलंदाजी संघ वाईड किंवा नो बॉलसाठी डीआरएस घेऊ शकतो.
4. अनुचित हालचाली केल्यास डेड बॉल
आयपीएल 2023 मधील सामन्यादरम्यान, यष्टीरक्षकासह संघातील कोणत्याही खेळाडूने चेंडू टाकण्यापूर्वी अनुचित हालचाली केल्या, तर चेंडू डेड बॉल म्हणून घोषित केला जाईल. अशा स्थितीत फलंदाजी करणाऱ्या संघालाही पेनल्टी म्हणून पाच धावा दिल्या जातील.
5. स्लो ओव्हर रेट मॅचसाठी शिक्षा
आयपीएलमध्ये स्लोओव्हर रेटची अनेकदा चर्चा होते. पण यावेळी जर एखाद्या संघाने असे केले तर त्याला सामन्यादरम्यानच शिक्षा होईल. आंतरराष्ट्रीय टी20 सामन्याप्रमाणे, कट ऑफ वेळेनंतर टाकल्या जाणार्या षटकांच्या संख्येत फक्त चार खेळाडू बाऊन्ड्रीवर उपस्थित असतील. तसेच, पॉवरप्लेनंतर, कर्णधार पाच खेळाडूंना बाऊन्ड्रीवर ठेवू शकतो.