KKR vs GT : आयपीएल 2022 (IPL 2022) मधील आजचा 35 वा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि गुजरात टायटन्स (KKR vs GT)या दोन्ही संघात पार पडला. हा सामना अवघ्या 8 धावांनी जिंकत गुजरातने स्पर्धेतील सहावा विजय मिळवत पुन्हा गुणतालिकेत पहिलं स्थान मिळवलं आहे. सामन्यात दोन्ही संघानी उत्तम कामगिरी केली. यावेळी आंद्रे रस्सेल याने अप्रतिम अष्टपैलू खेळीचं दर्शन घडवलं खरं पण अखेरच्या षटकात तो निर्धारित लक्ष्य गाठू न शकल्याने केकेआरने थोडक्यात सामना गमावला.  प्रथम फलंदाजी करणाऱ्या गुजरात संघाने कर्णधार हार्दिकच्या खेळीच्या जोरावर कोलकात्यासमोर 157 धावांचे आव्हान ठेवले होते. ज्यानंतर केकेआर 20 षटकात 148 धावाच करु शकला.



सामन्यात गुजरातने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय़ घेतला. शक्यतो नाणेफेक जिंकणारा संघ गोलंदाजी घेत असल्याचं दिसून आलं आहे. पण गुजरातने काहीसा वेगळा निर्णय़ घेतला. ज्याचा फायदाही त्यांना झाल्याचं पाहायला मिळालं. गुजरातचे बहुतेक फलंदाज खास कामगिरी करण्यात फेल झाले. पण कर्णधार हार्दिकने अर्धशतक ठोकल्यामुळे गुजरात एक चांगली धावसंख्या उभा करु शकली. सलामीवीर शुभमन 7 धावांवर स्वस्तात माघारी परतले. त्यानंतर हार्दिकने कोलकात्याविरुद्ध आतापर्यंत केलेल्या कामगिरीमुळे त्याने थेट दुसऱ्या स्थानावर फलंदाजीचा निर्णय़ घेतला. त्यानंतर साहा आणि पंड्या यांनी काहीसा डाव सावरला पण 25 धावा करुन साहा बाद झाला. त्यानंतर मधील फलंदाजही खास कामगिरी करु शकले नाही. मिलरने 27 धावांची खेळी केल्यामुळे काहीसा डाव सावरला. पण सर्व संघाचा विचार करता कर्णधार पांड्याने सर्वात चांगली कामगिरी केली. त्याने 49 चेंडूत 4 चौकार आणि 2 षटकार ठोकत 67 धावा केल्या. ज्यामुळे केकेआरला विजयासाठी 157 धावांची गरज होती.


रसेलची झुंज व्यर्थ


157 धावांचे आव्हान पार करण्यासाठी मैदानात आलेल्या केकेआरची सुरुवातच खराब झाली. दोन्ही सलामीवीर नारायण आणि बिलिंग्ज स्वस्तात माघारी परतले. कर्णधार अय्यरही 12 धावाच करु शकला. पण आज पहिली संधी मिळालेल्या रिंकून मात्र 35 धावांची महत्त्वपूर्ण खेळी करत संघाला सामन्यात परत आणलं. त्यानंतर आंद्रे रसेलने एकहाती संघाचा डाव सांभाळला. उमेशने त्याला साथ दिली. पण दोघेही सामना विजयापर्यंत घेऊन जाऊ शकले नाहीत. रसेलने 25 चेंडूत 48 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. पण केकेआरचा संघ 148 धावाच करु शकला ज्यामुळे केकेआर 8 धावांनी पराभूत झाली.


अशी पडली गोलंदाजी


दोन्ही संघानी चांगली गोलंदाजी केली. केकेआरने पहिल्या षटकापासून उत्तम गोलंदाजी कायम ठेवली. यावेळी क्षेत्ररक्षणही त्यांनी चांगलं ठेवलं. आज सामन्यात संधी मिळालेल्या रिंकू सिंगने तब्बल चार महत्त्वाचे झेल यावेळी घेतले. हार्दिकचा महत्त्वाचा झेलही त्यानेच घेतला. तर अखेरच्या षटकात गोलंदाजी करणाऱ्या आंद्रे रसेलने तब्बल 4 विकेट्स घेतले. याशिवाय टीम साऊदीने 3 तर उमेश यादव आणि शिवम मावीने प्रत्येकी एक विकेट घेतली.  पण विजेता संघ गुजरातकडून केकेआरपेक्षा अधिक चांगली गोलंदाजी झाली. त्याच्यांकडून शमी, राशिद आणि यश दयाल यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. तर जोसेफ आणि फर्ग्यूसनने प्रत्येकी एक विकेट घेतली. यावेळी शमी आणि राशिदने सर्वात चांगली गोलंदाजी केली. 


हे देखील वाचा-