IPL 2022 : आयपीएलच्या 15 व्या हंगामाला मुंबईत सुरुवात झाली आहे. कोलकाता आणि चेन्नई यांच्यात पहिला सामना रंगला आहे. यंदा लखनौ आणि गुजरात या दोन नव्या संघाची भर पडली आहे, त्यामुळे एकूण संघाची संख्या दहा झाली आहे. मुंबई, नवी मुंबई आणि पुण्यातील चार मैदानावर 70 सामने होणार आहे. तब्बल दोन महिने आयपीएलचा कुंभमेळावा रंगणार आहे. मागील 14 वर्ष आयपीएलनं भारतासह जगभरातल्या क्रिकेटप्रेमींना मनोरंजनाचा बंपर डोस दिला. आतापर्यंत 14 आयपीएल स्पर्धा झाल्या आहेत. यामध्ये मुंबई आणि चेन्नई सर्वात यशस्वी संघ आहेत. मुंबईने पाच वेळा तर चेन्नईने चार वेळा चषकावर नाव कोरलं आहे.


8 भारतीय, दोन विदेशी कर्णधार -
यंदाच्या आयपीएलमध्ये आठ संघाचे कर्णधार भारतीय आहेत. तर दोन संघाचे कर्णधार विदेशी आहेत. हैदराबाद संघाची धुरा केन विल्यमसन याच्या खांद्यावर आहे. तर आरसीबीचं नेतृत्व फाफ डुप्लेसिस याच्याकडे सोपवण्यात आले आहे. रोहित शर्मा (मुंबई), रवींद्र जाडेजा (चेन्नई), श्रेयस अय्यर (कोलकाता), ऋषभ पंत (दिल्ली), मयांक अग्रवाल (पंजाब), संजू सॅमसन (राजस्थान), के. राहुल (लखनौ) आणि हार्दिक पांड्या (गुजरात)


रोहित शर्मा सर्वात यशस्वी –
15 व्या हंगामातील दहा कर्णधारांमध्ये रोहित शर्मा सर्वात यशस्वी कर्णधार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबईने पाच आयपीएल चषकावर नाव कोरलं आहे. इतर 9 संघाच्या कर्णधाराकडे आयपीएल चषक जिंकण्याचा अनुभव नाही. केएल राहुल, संजू सॅमसन, हार्दिक पंड्या, मयंक अग्रवाल, श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा आणि ऋषभ पंत यांना आतापर्यंत एकदाही आयपीएल चषक जिंकता आलेला नाही. 


आयपीएल 2022 - 
आयपीएल 2022 हा 15 वा हंगाम भारतामध्ये कोरोना नियमांचे पालन करुन होणार आहे. लीग स्पर्धेत 70 सामने होणार आहेत. हे सर्व सामने मुंबई आणि पुणे येथील चार ठिकाणी होणार आहेत. मुंबईतील वानखेडे मैदानावर 20, ब्रेबॉन मैदानावर 15, डीवाय पाटील मैदानावर 20 आणि पुण्यातील मैदानावर 15 सामने खेळवले जाणार आहेत. प्रत्येक संघाला समान संधी मिळेल यासाठी बैठकीत निर्णय घेण्यात आला. त्यानुसार, प्रत्येक संघाचे चार चार सामने वानखेडे आणि डीवाय पाटील स्टेडिअम या मैदानावर होणार आहे. तर प्रत्येक संघाचे तीन तीन सामने ब्रेबॉन आणि पुणे मैदानावर होणार आहेत. प्रत्येक संघ लीग स्टेजमध्ये 14 सामने खेळणार आहे. त्यामध्ये पाच संघाविरोधात प्रत्येक संघाला दोन तर चार संघाविरोधात एक एक सामना खेळावा लागणार आहे.