Hardik Pandya, Ishan Kishan and Chawla visited the Siddhivinayak Temple in Mumbai : लागोपाठ तीन पराभवानंतर हार्दिक पांड्याने गुजरातमधील सोमनाथ मंदिरात पूजा-अर्चा केली होती. आता आरसीबीविरोधातील सामन्याआधी हार्दिक पांड्यानं मुंबईतील सिद्धीविनायक मंदिराला भेट दिली. हार्दिक पांड्याने गणपती बप्पापुढे विजयासाठी साकडे घातल्याचं समजतेय. यावेळी हार्दिक पांड्यासोबत मुंबईचा सलामी फलंदाज ईशान किशन आणि फिरकी गोलंदाज पियूष चावलाही होता. याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यानंतर आरसीबीविरोधात मुंबईला विजय मिळणार का? या चर्चेने जोर धरला आहे. 


आज मुंबईचा सामना आरसीबीसोबत - 


हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील मुंबईला यंदाच्या हंगामात शानदार कामगिरी करता आली नाही. चार सामन्यात फक्त एक विजय मिळवता आला. आज मुंबईचा सामना बलाढ्य आरसीबीसोबत होणार आहे. संध्याकाळी साडेसात वाजता वानखेडे मैदानावर हा सामना रंगणार आहे. दोन्ही संघ तळाला आहेत, प्लेऑफचं आव्हान जिवंत ठेवण्यासाठी दोन्ही संघाला विजय गरजेचा आहे. त्यामुळे आजचा सामना रोमांचक होण्याची शक्यता आहे. आजच्या सामन्याआधी हार्दिक पांड्याने सिद्धिविनियकाचं दर्शन घेतले.  






सोमनाथ मंदिरात खास पूजा -


याआधी दिल्लीविरोधातील सामन्यापूर्वी हार्दिक पांड्यानं गुजरातमधील सोमनाथ मंदिरात खास पूजा केली होती.  पहिल्या तीन सामन्यात मुंबईला दारुन परभावाचा सामना करावा लागला होता. त्यातच रोहित शर्माला कर्णधारपदावरुन काढल्यामुळे नाराज झालेल्या चाहत्याकडून हार्दिकला ट्रोल करण्यात आले होते. त्यामुळे खचलेला हार्दिक पांड्यानं थेट सोमनात मंदिर गाठलं होतं. हार्दिक पांड्याने सोमनाथ मंदिरात पूजा-अर्चा केली. याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. 






घरत भजन, हार्दिक पांड्यानं गायलं भजन - 


 हार्दिक पांड्या आणि कृणाल पांड्या यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यात दोन्ही भाऊ राम-कृष्ण भक्तीत रंगलेले दिसत आहेत. पारिवाराच्या कार्यक्रमात दोन्ही बंधू हरे रामा… हरे कृष्णा… भजन भजन गातांना दिसत आहेत. दोघांनी डिजायनर कुर्ता परिधान केला आहे. सोबत मित्र अन् परिवारातील लोक दिसत आहेत.






आरसीबीचे खेळाडूही सिद्धिविनायक मंदिरात - 


हार्दिक पांड्या आणि ईशान किशन यांच्याआधी आरसीबीच्या खेळाडूंनीही मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात जाऊन दर्शन घेतले. मुंबईविरोधात दोन हात करण्यासाठी आरसीबीचे खेळाडू मुंबईमध्ये दाखल झाले. त्यांनंतर काही खेळाडूंनी सिद्धिविनियक मंदिरांत जाऊन गणपती बप्पाचं दर्शन घेतलं.