GT vs DC IPL 2026 : डेव्हिड मिलरनं दिल्लीला विजयाजवळ पोहोचवलं पण एका निर्णयानं पराभवाचा झटका, गुजरातचा पहिला विजय
IPL 2026 DC vs GT : दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यातील सामना रंगतदार झाला. गुजरातनं हा सामना एक रननं जिंकला.

DC vs GT LIVE Score IPL 2026 नवी दिल्ली : आयपीएलच्या 19 व्या हंगामातील 14 व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स आमने सामने आले होते. दिल्लीनं टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तर, गुजरात टायटन्सनं प्रथम फलंदाजी करताना 4 बाद 210 केल्या. या धावसंख्येचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सनं चांगली सुरुवात केली होती. केएल राहुलनं 92 धावा केल्या. तर, डेव्हिड मिलरनं नाबाद 41 धावा केल्या. मात्र, शेवटच्या ओव्हरमध्ये डेव्हिडचा एक निर्णय चूकला आणि दिल्लीचा 1 रननं पराभव झाला. दिल्ली कॅपिटल्सच्या संघानं 20 ओव्हरमध्ये 209 धावा केल्या.
मिलरचा एक निर्णय चूकला
दिल्ली कॅपिटल्सनं 211 धावांचा पाठलाग करताना चांगली सुरुवात केली होती.निसांका बाद झाला तेव्हा दिल्लीनं 76 धावा केल्या होत्या. यानंतर नितीश राणा, समीर रिझवी, अक्षर पटेल, ट्रिस्टन स्टब्स चांगली कामगिरी करु शकले नाहीत. केएल राहुलनं 52 बॉलमध्ये 92 धावा केल्या. यामध्ये त्यानं 11 चौकार आणि 4 षटकार मारले. दिल्ली कॅपिटल्सला विजयासाठी अखेरच्या दोन ओव्हरमध्ये 36 धावांची गरज होती. मोहम्मद सिराजच्या 19 व्या ओव्हरमध्ये दिल्लीनं 23 धावा काढल्या. अखेरच्या ओव्हरमध्ये दिल्ली कॅपिटल्सला 13 धावा करायच्या होत्या. दिल्लीला 11 धावा करता आल्या. अखेरच्या 2 बॉलमध्ये दिल्लीला 2 धावा हव्या होत्या. मात्र पाचव्या बॉलवर डेव्हिड मिलरनं रन घेतली नाही. यामुळं दिल्लीला विजयासाठी 1 बॉल आणि 2 धावा हव्या होत्या. अखेरच्या बॉलवर मिलरला फटका मारता आला नाही आणि कुलदीप यादव धावबाद झाला आणि गुजरातनं विजय मिळवला.
गुजरातनं केल्या 210 धावा
गुजरात टायटन्सनं प्रथम फलंदाजी करताना 20 ओव्हरमध्ये 4 बाद 210 धावा केल्या होत्या. गुजरात टायटन्सकडून जोस बटलर, कॅप्टन शुभमन गिल आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी अर्धशतक केल्यानं ते 210 धावांपर्यंत पोहोचू शकले. गुजरातकडून शुभमन गिलनं सर्वाधिक 70 धावा केल्या. दिल्ली कॅपिटल्सकडून मुकेश कुमारनं 2 विकेट घेतल्या. गुजरातचा साई सुदर्शन 7 बॉलमध्ये 12 धावा करुन बाद झाला. जोस बटलर यानं 27 बॉलमध्ये 52 धावा केल्या. कुलदीप यादवनं बटलरला बाद केलं. शुभमन गिलनं 45 बॉलमध्ये 70 धावा केल्या. वॉशिंग्टन सुंदर यानं 55 धावा केल्या. तर ग्लेन फिलिप्स 14 धावा करुन नाबाद राहिला.
दिल्ली कॅपिटल्सनं नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गुजरातच्या टीममध्ये आज शुभमन गिलनं कमबॅक केलं. शुभमन गिल मांसपेशींच्या दुखण्यामुळं राजस्थान रॉयल्स विरद्ध खेळू शकला नव्हता.
गुजरात टायटन्स (प्लेईंग इलेव्हन ): शुभमन गिल (कर्णधार), साई सुदर्शन, जोस बटलर (विकेट कीपर), वाशिंगटन सुंदर, ग्लेन फिलिप्स, शाहरुख खान, राहुल तेवतिया, राशिद खान, कगिसो रबाडा, मोहम्मद सिराज, अशोक शर्मा
दिल्ली कॅपिटल्स (प्लेईंग इलेव्हन): केएल राहुल (विकेट कीपर), पथुम निसांका, नीतीश राणा, विप्रज निगम, अक्षर पटेल (कर्णधार), डेविड मिलर, ट्रिस्टन स्टब्स, कुलदीप यादव, लुंगी एनगिडी, टी नटराजन, मुकेश कुमार




















