CSK vs GT IPL 2023 Qualifier 1 : इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) यंदाच्या सोळाव्या हंगामातील प्लेऑफच्या (IPL 2023 Playoffs) लढतीला आजपासून सुरुवात होत आहे. प्लेऑफमधील पहिला क्वालिफायर (IPL 2023 Qualifier 1) सामन्यात आज चेन्नई संघाला त्यांच्या घरच्या मैदानावर गुजरात संघाचं आव्हान असेल. चेन्नईच्या चेपॉक मैदानावर म्हणजेच एम चिदंबरम स्टेडिअमवर हा संध्याकाळी हा सामना पाहायला मिळणार आहे. चेन्नई सुपर किंग्सचं होमग्राऊंड एमए चिदंबरम स्टेडियम म्हणजेच चेपॉक स्टेडिअमवर संघाने यंदाच्या मोसमातील सात सामन्यांपैकी चार सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे.
चेन्नई संघ बाराव्यांदा प्लेऑफमध्ये दाखल
महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्त्वात चेन्नई संघ बाराव्या वेळेस आयपीएल प्लेऑफमध्ये पोहोचण्यात यशस्वी ठरला आहे. या मोसमातील शेवटच्या साखळी सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने दिल्ली कॅपिटल्सला पराभूत केल्यानंतर 17 गुणांसह गुणतालिकेत दुसरं स्थान काबीज केलं. आता पहिल्या क्वालिफायर सामन्यात चार वेळा विजेत्या चेन्नईचा सामना गतविजेत्या गुजरात टायटन्सशी होणार आहे.
शेवटच्या 2 प्लेऑफ सामन्यांमध्ये चेन्नईचा पराभव
चेपॉक येथे झालेल्या शेवटच्या 2 प्लेऑफ सामन्यांमध्ये चेन्नई सुपर किंग्जला पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. त्याशिवाय गुजरात विरोधात चेन्नई संघाला एकही आयपीएल सामना जिंकता आलेला नाही. त्यामुळे चेपॉकवर खेळताना चेन्नई हा नकोसा विक्रम मोडत गुजरातविरोधात पहिला ऐतिहासिक विजय मिळवण्याचा प्रयत्न करेल.
चेपॉकवरील प्लेऑफमध्ये चेन्नईची कामगिरी
चेन्नई संघाने आयपीएलमध्ये (Indian Premier League) आतापर्यंत 24 प्लेऑफ सामने खेळले आहेत. त्यापैकी 15 जिंकले आहेत तर 9 मध्ये पराभव झाला आहे. एमए चिदंबरम स्टेडियम म्हणजेच चेपॉक स्टेडिअम चेन्नईचा बालेकिल्ला असल्यामुळे या मैदानावर त्यांचा पराभव करणे हे विरोधी संघासमोर आव्हान असतं. चेपॉक स्टेडियमवरील प्लेऑफ सामन्यांमध्ये चेन्नई संघाची कामगिरी पाहिली तर चेन्नईने चेपॉकवर खेळलेल्या चार 4 पैकी दोन सामन्यांमध्ये संघाला विजय आणि दोन सामन्यांमध्ये पराभव झाला आहे. 2011 मध्ये चेन्नईने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धचा अंतिम सामना 58 धावांनी जिंकला होता.
चेन्नई सुपर किंग्स संघाने 2012 मध्ये दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात 86 धावांनी विजय मिळवला. या मैदानावर 2012 च्या अंतिम सामन्यात चेन्नईला कोलकात्याकडून 5 विकेटने पराभव स्वीकारावा लागला होता. 2019 मध्ये मुंबई इंडियन्सविरुद्धच्या क्वालिफायर 1 सामन्यातही चेन्नईला 6 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला होता.