Glenn Phillips Injured IPL 2025 : गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील आयपीएल 2025 चा 19 वा सामना राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जात आहे. गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिलने नाणेफेक जिंकून सनरायझर्स हैदराबादला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या सनरायझर्स हैदराबाद संघाची सुरुवात खराब झाली. त्याने 6 षटकांत एकूण 2 विकेट गमावल्या. सामन्यादरम्यान गुजरातला मोठा धक्का बसला जेव्हा ग्लेन फिलिप्स जखमी झाला.
सहाव्या षटकात घडली घटना
पहिल्या डावात गुजरातसाठी एक वाईट बातमी आली, जेव्हा जगातील सर्वोत्तम क्षेत्ररक्षकांपैकी एक ग्लेन फिलिप्सला थ्रो करताना दुखापत झाली. खरंतर, सहाव्या षटकात इशान किशनने चौथ्या चेंडूवर एक धाव घेतली. यादरम्यान, चेंडू ग्लेन फिलिप्सच्या हातात गेला. पण जेव्हा ग्लेन चेंडू टाकत होता तेव्हा त्याचा पाय मुरगळला आणि तो जमिनीवर पडला. यानंतर फिजिओथेरपिस्ट मैदानावर आले आणि त्यांनी प्रयत्न सुरू केला. पण तो वेदनेने कण्हत होता, त्यामुळे अखेर त्याला मैदान सोडावे लागले.
ग्लेन फिलिप्स 2025 आयपीएलमध्ये खेळला नाही एकही सामना...
ग्लेन फिलिप्स सध्या जगातील सर्वोत्तम क्षेत्ररक्षकांपैकी एक आहे. पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमध्ये त्याने त्याच्या वादळी खेळीमुळे एक खास ओळख निर्माण केली आहे. असे असूनही, गुजरात संघाच्या व्यवस्थापनाने अद्याप फिलिप्सला आयपीएल 2025 मध्ये एकही सामना खेळण्याची संधी दिलेली नाही. फिलिप्सने आतापर्यंत इंडियन प्रीमियर लीगमध्ये खेळलेल्या 8 सामन्यांमध्ये फक्त 65 धावा केल्या आहेत आणि अष्टपैलू खेळाडूची भूमिका बजावताना 2 विकेटही घेतल्या आहेत.
दोन्ही संघाची प्लेइंग-11
सनरायझर्स हैदराबाद : ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, इशान किशन, नितीश कुमार रेड्डी, हेनरिक क्लासेन, अनिकेत वर्मा, कामिंडू मेंडिस, पॅट कमिन्स (कर्णधार), झीशान अन्सारी, जयदेव उनाडकट, मोहम्मद शमी.
गुजरात टायटन्स : शुभमन गिल (कर्णधार), साई सुदर्शन, जोस बटलर, राहुल तेवतिया, शाहरुख खान, रशीद खान, वॉशिंग्टन सुंदर, आर साई किशोर, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, इशांत शर्मा.
