हैदराबाद : सध्या आयपीएलचा हंगाम जोरदार अन् शानदारपणे सुरू असून आयपीएलचे (IPL) सर्वच संघ मुंबई, हैदराबाद, अहमदाबाद, चेन्नई यांसह महत्त्वाच्या शहरात दौरे करत आहेत. आयपीएलच्या विविध संघांच्या खेळाडूंचा मुक्कामही या शहरांतील फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यातच, सनराईजर्स हैदराबादचा संघ हैदराबादमधील (Hyderabad) बंजारा हिल्स परिसरातील पार्क हयात या पंचतारांकित हॉटेलमध्ये मुक्कामास आहे. दरम्यान, येथील हॉटेलमध्ये अचानक आग (Fire) लागल्याची घटना घडल्याने सर्वांची धांदल उडाली. 

हैदराबादमधील हॉटेल पार्क हयातमध्ये रविवारी सायंकाळी 6.30 वाजताच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. या आगीच्या घटनेत एक संपूर्ण मजल्याला व्यापले होते. या आगीची माहिती मिळताच फायर ब्रिगेडच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून जवानांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. विशेष म्हणजे याच हॉटेलमध्ये आयपीएलचा SRH संघ मुक्कामी होता. त्यामुळे, सर्वांनी धावाधाव करत या खेळाडूंना सुखरुप बाहेर काढले आहे. सध्या, आग आटोक्यात आणण्यात आली आहे. तर, सनराईजर्स हैदराबाद संघाचे सर्व खेळाडू सुरक्षित असल्याची माहितीही ट्विटरवरुन देण्यात आली आहे. 

दरम्यान, अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. त्यामुळे, फायर ब्रिगेडच्या जवानांनी कुठलीही नुकसान न होता हॉटेलमधून एसआरएच संघाला आणि रहिवाशांना सुखरुप बाहेर काढले. सुदैवाने या आगीत कुठलीही मोठी हानी झाली नसल्याचं पीटीआयने म्हटलं आहे.  

हेही वाचा

अजित दादांच्या खात्यात मुख्यमंत्र्यांची घुसकोरी; रोहित पवारांचा दावा, देवेंद्र फडणवीसांना सल्ला