चेन्नई : आयपीएलच्या (IPL 2024) पहिल्या मॅचमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bengaluru) आणि चेन्नई सुपर किंग्जमध्ये (Chennai Super Kings) लढत होत आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं टॉस जिंकत पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. फाफ डु प्लेसिसनं टॉस जिंकल्यानंतर बॅटिंगचा निर्णय जाहीर केला. ऋतुराज गायकवाडनं (Ruturaj Gaikwad) कप्तान म्हणून पहिल्याच मॅचमध्ये मोठा निर्णय घेतला आहे. ऋतुराज गायकवाडनं समीर रिझवीला (Sameer Rizvi) संघात स्थान दिलं आहे. चेन्नई सुपर किंग्जच्या टीममध्ये यंदा अंबाती रायडूचा समावेश नाही. अंबाती रायडूच्या जागी चेन्नईनं समीर रिझवीला संधी दिली आहे. समीर रिझवीला चेन्नईच्या टीमनं 8.4 कोटी रुपयांची बोली लावत संघात घेतलं होतं. 


कोण आहे समीर रिझवी


समीर रिझवी हा मूळचा उत्तर प्रदेशच्या अलीगड आणि मेरठशी संबंधित आहे.  चेन्नईनं त्याला मोठी रक्कम मोजत संघात घेतलं होतं. चेन्नई सुपर किंग्जचा बॅटिंग कोच म्हणून काम करणाऱ्या माइक हस्सीनं समीर रिझवीबाबत मोठं वक्तव्य केलं होतं. अंबाती रायडू जी भूमिका चेन्नई सुपर किंग्जसाठी बजावत होता ती भूमिका समीर रिझवी बजावेल, असं हस्सीनं म्हटलं होतं. 


समीर रिझवीनं यूपी लीगमध्ये 400 हून अधिक धावा केल्या होत्या. त्यामध्ये त्यानं 35 षटकार मारले होते. यानंतर तो चर्चेत आला होता. तेव्हापासूनच चेन्नई सुपर किंग्जनं त्याच्यावर लक्ष ठेवलं होतं. 


समीर रिझवीनं कानपूरमध्ये सुरु असलेल्या कर्नल सी.के. नायडू ट्रॉफीमध्ये सौराष्ट्र विरुद्ध 266 बॉलमध्ये 33 चौकार आणि 12 षटकारांच्या मदतीनं 312 धावा केल्या होत्या. यापूर्वी अंडर 19 क्रिकेटमध्ये 327 धावा केल्या होत्या. 


उत्तर प्रदेशच्या मेरठमधील पाच खेळाडूंची आयपीएलमध्ये निवड झालेली आहे. समीर रिझवी चेन्नईकडून बॅटिंग करताना दिसेल तर दुसरीकडे  आरसीबीकडून मेरठचा कर्ण शर्मा बॉलिंग करताना दिसून येत आहे. यापूर्वी आयपीएलमध्ये भुवनेश्वर कुमार, कार्तिक त्यागी, शिवम मावी यांना संधी मिळाली आहे. हे खेळाडू वेगवेगळ्या टीमचं प्रतिनिधीत्व करत आहेत. चेन्नईचा नवा कॅप्टन ऋतुराज गायकवाडनं सिक्सर किंग समीर रिझवीला टीममध्ये स्थान दिलं आहे. समीर रिझवीच्या कामगिरीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 


दरम्यान,अंबाती रायडू 2018 पासून 2023 पर्यंत चेन्नईच्या टीमचा भाग होता. अंबाती रायडू मिडल ओव्हर्समध्ये चेन्नईसाठी बॅटिंग करायचा. गेल्या वर्षी त्यानं आयपीएलमधून निवृत्ती जाहीर केली.


चेन्नईची प्लेईंग 11 - 


रचीन रवींद्र, ऋतुराज गायकवाड, अजिंक्य रहाणे, समीर रिझवी, डॅरेल मिचेल, महिश तिक्ष्णा, रवींद्र जाडेजा, एमएस धोनी, मुस्तफिजुर रहमान, तुषार देशपांडे, दीपक चाहर


आरसीबीची प्लेईंग 11 - 


फाफ डु प्लेसिस, विराट कोहली, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, कॅमरुन ग्रीन, दिनेश कार्तिक, अनुज रावत, कर्ण शर्मा, मयांक डांगर, मोहम्मद सिराज, अल्जारी जोसेफ


संबंधित बातम्या :


CSK vs RCB Score Live IPL 2024: 'माही' मैदानाबाहेर चेंडू टोलावणार, किंग कोहली सलामीला येणार; CSK-RCB आज भिडणार


आयपीएल फुकटात कशी, कधी अन् कुठे पाहावी?; जाणून घ्या....