IPL Final 2023 : आयपीएलच्या सोळाव्या मोसमाचा विजेता कोण?  धोनीची चेन्नई सुपर किंग्स, की हार्दिक पांड्याची गुजरात टायटन्स या प्रश्नाचं उत्तर मिळणार होतं. पण अहमदाबादमध्ये जोरदार पाऊस पडल्यामुळे आज सामना झाला नाही. जवळपास चार ते पाच तास इथं जोरदार पाऊस पडला. पंचांनी रात्री 11 वाजेपर्यंत सामना सुरु होण्याची वाट पाहिली.. पण पावसाने विश्रांती घेतली नाही. त्यामुळे क्रिकेटप्रेमींचा हिरमोड झालाय. आता राखीव दिवशी, म्हणजेच सोमवारी आयपीएलच्या सोळाव्या हंगामाचा विजेता मिळणार आहे. पण सोमवारी पावसाने उसंत घेतली नाही, तर गुजरातला जेतेपद देण्यात येणार आहे. कारण, साखळी फेरीत गुजरातचा संघ पहिल्या क्रमांकावर होता. 


सोमवारी रात्री साडेसात वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे. यंदाच्या मोसमात हार्दिक आणि धोनीच्या दोन्ही फौजा तिसऱ्यांदा आमनेसामने उभ्या ठाकणार होत्या. चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या कारकीर्दीतला कदाचित हा अखेरचा IPL सामना ठरण्याची शक्यता आहे.. त्यामुळं चेन्नईचे शिलेदार धोनीला विजेतेपदाची भेट देण्याचा प्रयत्न करतील. दरम्यान, गुजरात टायटन्सनं लागोपाठ दुसऱ्या वर्षी IPL च्या फायनलमध्ये धडक मारलीय. IPL च्या मागच्या मोसमात गुजरातनं राजस्थान रॉयल्सला नमवून विजेतेपद पटकावलं होतं. यंदा त्या पराक्रमाची पुनरावृत्ती करण्याचा गतविजेत्या गुजरातचा प्रयत्न राहील. पण चारवेळा IPL जिंकणाऱ्या चेन्नईचं यंदा गुजरातसमोर तगडं आव्हान आहे. या पार्श्वभूमीवर IPL च्या फायनलमध्ये चेन्नई आणि गुजरात संघांमध्ये कांटे की टक्कर पाहायला मिळण्याची चिन्हं आहेत...एकीकडे क्रिकेटप्रेमींची उत्सुकता शिगेला लागलीय.. मात्र दुसरीकडे सामन्यावर पावसाचं सावट असल्याचं चित्र पाहायला मिळतंय.










अहमदाबादमध्ये संध्याकाळी जवळपास पाच ते सहा तास पावसाची उघडझाप झाली. पावसाने ये जा केली.. कधी विश्रांती तर कधी धो धो कोसळला... त्यामुळे मैदान सुखवणाऱ्या कर्मचाऱ्यांची धावाधाव झाली. स्टेडिअममध्ये उपस्थित असणाऱ्या प्रेक्षकांचा हिरमोड झाला. आज त्यांना रिकाम्या हाती परत जावे लागले. उद्या पुन्हा प्रेक्षक मैदानात सामना पाहण्यासाठी येतील. आजचे तिकिटे उद्या चालतील, असे आयपीएलने स्पष्ट केलेय.