Lucknow Super Giants vs Chennai Super Kings : चेन्नई सुपर किंग्जने लखनौ सुपर जायंट्सचा 5 विकेट्सने पराभव केला. सलग पाच पराभवांनंतर चेन्नईने आयपीएल 2025 मध्ये विजय मिळवला. एकाना स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात, लखनौ सुपर जायंट्सने प्रथम फलंदाजी करत 166 धावा केल्या, प्रत्युत्तरात, शेवटच्या षटकापर्यंत चाललेल्या या सामन्यात सीएसके संघाने 5 विकेट्सने आपला विजय निश्चित केला. एमएस धोनीने 11 चेंडूत 26 धावांची तुफानी खेळी करून सीएसकेच्या विजयात मोठे योगदान दिले. 

एडेन मार्कराम अन् निकोलस पूरन ठरले फेल...

नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या लखनौ सुपर जायंट्सची सुरुवात खराब झाली. सलामीवीर एडेन मार्कराम (6) उत्तम फॉर्ममध्ये असलेला निकोलस पूरन(8) धावा करून आऊट झाले. येथून, मिचेल मार्श आणि कर्णधार ऋषभ पंत यांनी अर्धशतकी भागीदारी केली आणि धावसंख्या 73 पर्यंत नेली. मार्शने काही चांगले फटके खेळले पण नंतर 25 चेंडूत 30 धावा काढून तो बाद झाला. यादरम्यान त्याने दोन चौकार आणि दोन षटकार मारले.

आयपीएल 2025 मध्ये ऋषभ पंतने ठोकले पहिले अर्धशतक 

मार्श बाद झाल्यानंतरही पंतने गड राखला. एलएसजीच्या कर्णधाराने आयुष बदोनीसह धावसंख्या 100 च्या पुढे नेली. बदोनीने 17 चेंडूत 20 धावांची खेळी केली. त्यानंतर पंतने आपले अर्धशतक पूर्ण केले आणि फॉर्ममध्ये परतल्याचे संकेत दिले. पंतने आऊट होण्यापूर्वी 49 चेंडूत 63 धावा केल्या, ज्यामध्ये चार चौकार आणि चार षटकारांचा समावेश होता. अब्दुल समदनेही 11 चेंडूत 20 धावा केल्या. चेन्नई सुपर किंग्जकडून रवींद्र जडेजा आणि मथिशा पाथिराना यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.

शेख रशीद आणि रचिन रवींद्र यांनी दिली स्फोटक सुरुवात 

167 धावांच्या लक्ष्याला प्रत्युत्तर देताना सीएसकेची सुरुवात चांगली झाली. शेख रशीद आणि रचिन रवींद्र यांनी स्फोटक फलंदाजी केली. मात्र, शेख रशीद पाचव्या षटकात बाद झाला. त्याच्या बॅटमधून 27 धावा आल्या. मात्र, रवींद्रची विकेट आठव्या षटकात पडली. त्याला 37 धावा करता आल्या. यानंतर, पुढच्याच षटकात राहुल त्रिपाठीही बाद झाला. जडेजा देखील चमत्कार करू शकला नाही आणि 7 धावा करून बाद झाला. यानंतर, 15 व्या षटकात विजय शंकरही 9 धावा काढून बाद झाला.

शेवटच्या 5 षटकात एमएस धोनी अन् शिवम दुबेचा कहर 

शेवटच्या 5 षटकांत एमएस धोनी आणि शिवम दुबे यांनी चांगली फलंदाजी केली आणि एलएसजी गोलंदाजांवर दबाव निर्माण केला. धोनी आणि दुबे यांच्यात 57 धावांची नाबाद भागीदारी झाली, ज्यामुळे चेन्नई सुपर किंग्जला सलग पाच पराभवांनंतर विजय मिळाला. आयपीएल 2025 मध्ये 7 सामन्यांमधील सीएसकेचा हा एकमेव दुसरा विजय आहे. धोनीने 11 चेंडूत 26 धावा केल्या, तर शिवम दुबेने 37 चेंडूत 43 धावांची नाबाद खेळी केली.

आयपीएलमध्ये 200 डिसमिसल करणार धोनी पहिला खेळाडू

लखनौ सुपर जायंट्सच्या डावात रवींद्र जडेजाच्या गोलंदाजीवर एमएस धोनीने आयुष बदोनीला यष्टीचीत करताच, त्याने लीगच्या इतिहासात 200 झेल पूर्ण केले आणि असे करणारा तो पहिला खेळाडू बनला. धोनीने आता आयपीएलमध्ये एकूण 201 झेल घेतले आहेत, त्यापैकी त्याने 155 झेल घेतले आहेत आणि 46 स्टंपिंग केले आहेत. यामध्ये क्षेत्ररक्षक म्हणून घेतलेले 4 झेल समाविष्ट आहेत.