CSK Accused Of Ball Tampering Vs MI : ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्जने आयपीएल 2025 मध्ये आपल्या मोहिमेची सुरुवात विजयाने केली. रविवारी सीएसकेचा पहिला सामना मुंबई इंडियन्सविरुद्ध होता. यजमान संघाने हा एल क्लासिको सामना 4 विकेट्सने जिंकला. सीएसकेच्या या विजयानंतर धोनीच्या स्टंपिंगपासून ते रचिन रवींद्रच्या स्फोटक खेळीपर्यंत सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव झाला. पण त्याचदरम्यान आणखी एका व्हिडिओने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सोशल मीडियावरील चाहते सीएसकेवर बॉल टॅम्परिंगचा आरोप करत आहेत.
या सामन्यात चेन्नईचा गोलंदाज खलील अहमदने रोहित शर्मासह 3 महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या. मात्र, आता खलील अहमद आणि ऋतुराज गायकवाड यांचा सामन्यादरम्यानचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो पाहून लोक संघावर बॉल टॅम्परिंगचा आरोप करत आहेत. अनेक वापरकर्ते सीएसके संघावर बंदी घालण्याची मागणी करत आहेत.
खलील अहमदने ऋतुराज गायकवाडला काय दिले?
सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये दिसतंय की खलील गोलंदाजी करताना अचानक थांबवतो, मग कर्णधार ऋतुराज गायकवाड त्याच्याकडे येतो आणि काहीतरी बोलतो. यादरम्यान, खलील अहमद त्याच्या खिशातून काहीतरी काढतो आणि ऋतुराजला देतो. कॅप्टनही ती वस्तू पटकन खिशात ठेवतो. ही गोष्ट इतकी लहान होती की खलील अहमदने ऋतुराजला काय दिले हे स्पष्टपणे समजले नाही. पण, सोशल मीडियावर चाहते खलीलवर बॉल टॅम्परिंगचा आरोप करत आहेत.
बॉल टॅम्परिंग म्हणजे काय?
क्रिकेटमध्ये बॉल टॅम्परिंग हा गुन्हा आहे. जेव्हा कोणी चेंडूशी छेडछाड करतो तेव्हा त्याला बॉल टॅम्परिंग म्हणतात. स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर आणि कॅमेरॉन बॅनक्रॉफ्ट यांना बॉल टॅम्परिंग प्रकरणात दोषी ठरवण्यात आले, जे सँडपेपर गेट स्कँडल म्हणून प्रसिद्ध आहे. एमसीसी कायदा 42.3 अंतर्गत बॉल टॅम्परिंग हा गुन्हा मानला जातो.