Chennai Super Kings IPL 2024 : आयपीएलच्या सतराव्या हंगामाच्या पूर्वसंध्येला महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) चेन्नई सुपर किंग्सच्या (CSK) कर्णधारपदावरून पायउतार झाला. आणि विशेष म्हणजे पुण्याचा मराठमोळा शिलेदार ऋतुराज गायकवाडची (Ruturaj Gaikwad) धोनीचा वारसदार म्हणून चेन्नई सुपर किंग्सच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आयपीएलच्या इतिहासातल्या सर्वात यशस्वी अशा दोन कर्णधारांपैकी एक हा धोनी आहे. त्याच्या कर्णधारपदाच्या कारकीर्दीत चेन्नईनं आयपीएलची तब्बल पाच विजेतीपदं पटकावली आहेत. पण तोच धोनी आज 42 वर्षांचा आहे आणि चेन्नई सुपर किंग्सच्या नेतृत्त्वात झालेला खांदेपालट लक्षात घेता, त्याचा एक खेळाडू म्हणून हा अखेरचा मोसम ठरू शकतो. वास्तविक धोनीनं 2022 सालच्या आयपीएलआधी चेन्नईच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता. त्याच्याऐवजी कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आलेल्या जाडेजाच्या नेतृत्त्वाखाली चेन्नई सुपर किंग्सची कामगिरी ढासळली होती. त्यामुळं धोनीनं कर्णधारपदाची सूत्रं पुन्हा हाती घेतली होती. पण आता नवा कर्णधार ऋतुराज गायकवाडकडे चेन्नईची फ्रँचाईझी एक दीर्घकालीन गुंतवणूक म्हणून पाहत आहे. पण ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात चेन्नई यंदा जेतेपदाला गवसणी घालणार का? असा सवाल चाहत्यांकडून उपस्थित केला जातोय. धोनीनं कर्णधारपद सोडल्यानंतरही सीएसके विजयाचा प्रबळ दावेदार आहे. 


धोनीच्या नेतृत्वात 2023 मध्ये CSK ने चषक उंचावला होता. आता पुन्हा एकदा चषकावर नाव कोरण्यासाठी चेन्नईचा संघ सज्ज झाला आहे. चेन्नईच्या संघात अनुभवी आणि युवा खेळाडूंचा भरणा आहे. अष्टपैलू खेळाडूही ढिगभर आहेत. चेन्नईच्या संघात एकापेक्षा एक धुरंधर अनुभवी खेळाडूंचा भरणा आहे. त्यामुळे ऋतुराज गायकवाडला फारशी मेहनत घेण्याची गरज नाही. कर्णधार झाल्यानंतर ऋतुराज गायकवाडनंही ही गोष्ट मान्य केली होती. माही भाई, जड्डू भाई आणि अज्जू भाई माझ्या सपोर्टसाठी असल्याचं त्यानं सांगितलं होत. त्यावरुनच ऋतुराज गायकवाड याला सपोर्ट करण्यासाठी अनेकजण अनुभवी खेळाडू असल्याचं दिसतेय. 


धोनीनं फक्त कर्णधारपद सोडलेय, तो खेळाडू म्हणून मैदानात असणार आहे, ही सर्वात मोठी गोष्ट आहे. धोनी मैदानावर  ऋतुराजला नेतृत्वाचे धडे नक्कीच देईल. सगळ्या हंगामात धोनी ऋतुराजच्या पाठीमागे खंबीरपणे उभा असेल. ऋतुराज गायकवाडला फक्त धोनीकडून ती गोष्ट शिकायची आहे. त्यामुळेच चेन्नई यंदाही विजयाचा प्रबळ दावेदार असल्याचं दिसतेय. 


2019 पासून ऋतुराज चेन्नईचा सदस्य - 


दरम्यान, 2019 पासून ऋतुराज गायकवाड चेन्नईचा सदस्य आहे. 2020 मध्ये ऋतुराज गायकवाडनं आयपीएलमध्ये पदार्पण केले. पहिल्या हंगामात त्याला प्रभावी कामगिरी करता आली नाही. पण 2021 च्या हंगामापासून ऋतुराज गायकवाडनं खोऱ्यानं धावा चोपल्या आहेत. ऋतुराज गायकवाड धोनीच्या नेतृत्वाखाली खूप काही शिकला आहे, त्यामुळे धोनी कसा नेतृत्व करतो, हे त्याला नक्कीच माहिती असेल. ऋतुराज गायकवाड धोनीचा वारसा यशस्वी चालवेल, असा विश्वास चाहत्यांना आहे.