Abhishek Sharma : अभिषेक शर्माच्या 'त्या' नोटचं गुपित ट्रॅविस हेडनं फोडलं, म्हणाला गेल्या 6 मॅचपासून....
Abhishek Sharma : अभिषेक शर्मानं पंजाब किंग्ज विरुद्ध शतक झळकावल्यानंतर जी नोट दाखवली होती त्याची स्टोरी ट्रॅविस हेडनं सांगितली आहे.

हैदराबाद : आयपीएलमध्ये काल झालेल्या सनरायजर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्ज यांच्यातील मॅचमध्ये धावांचा पाऊस पडला. पंजाब किंग्जनं पहिल्यांदा फलंदाजी करताना 245 धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना हैदराबादचे सलामीवीर ट्रेविस हेड आणि अभिषेक शर्मानं धावांचा पाऊस पाडला. अभिषेक शर्मानं 55 बॉलमध्ये 141 धावांची खेळी केली. या खेळीत त्यानं 14 चौकार आणि 10 षटकार मारले. तर, ट्रेविस हेडनं 71 धावांची खेळी केली. हैदराबादला या दोघांनी 171 धावांची सलामीची भागीदारी करुन दिली. अभिषेक शर्मानं 40 बॉलमध्ये शतक झळकवलं. या शतकावेळी अभिषेक शर्मानं खिशातून एक नोट काढली आणि हैदराबादच्या प्रेक्षकांना दाखवली. यावेळी मैदानावर उपस्थित असलेला पंजाबचा कॅप्टन श्रेयस अय्यर देखील स्वत: ला रोखू शकला नाही. सनरायजर्स हैदराबादचा सलामीवीर ट्रेविस हेडनं त्या नोट मागील स्टोरी सांगितली आहे.
अभिषेक शर्माच्या नोटमध्ये काय लिहिलेलं?
अभिषेक शर्माचं हे आयपीएलमधील पहिलं शतक ठरलं. अभिषेक शर्माच्या सेलिब्रेशनमध्ये जी नोट पाहायला मिळाली त्यामध्ये हे शतक ऑरेंज आर्मीसाठी असल्याचं लिहिलं होतं. अभिषेक शर्मानं हे शतक हैदराबादच्या प्रेक्षकांना समर्पित केलं.
अभिषेक शर्माच्या नोट संदर्भात हैदराबादचा सलामीवीर ट्रेविस हेडनं माहिती दिली आहे. अभिषेक शर्मानं ही नोट गेल्या 6 मॅचपासून खिशात ठेवली होती. आनंदाची बाब म्हणजे ती नोट आज बाहेर आली, असं ट्रेविस हेडनं म्हटलं.
अभिषेक शर्माला मार्गदर्शन करणाऱ्या युवराज सिंगनं देखील अभिनंदन केलं आहे. वाह शर्माजी के बेटे, 98 धावांवर असताना एक रन, 99 धावांवर असताना एक रन, इतकी मॅच्युरिटी अपेक्षित नाही, असं युवराज सिंगनं गमतीनं म्हटलं. अभिषेक शर्मा आणि ट्रेविस हेडची फलंदाजी पाहणं मेजवानी आहे, असं युवराज सिंग म्हणाला.
अभिषेक शर्मान मॅच जिंकल्यानंतर कॅप्टन ट्रेविस हेडचे आभार मानले आहेत. याशिवाय त्यानं सूर्यकुमार यादवनं देखील फोन करुन प्रोत्साहन दिल्याची आठवण अभिषेक शर्मानं सांगितली.
Travis Head said, "the note has been in the pocket of Abhishek Sharma for 6 games, glad it came out tonight". 🤣❤️ pic.twitter.com/OdUMBJSjRM
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) April 12, 2025
पंजाब किंग्जनं हैदराबाद पुढं 245 धावांचं आव्हान ठेवलं होतं. या धावसंख्येचा पाठलाग करताना हैदराबादनं 18.3 ओव्हरमध्येच यश मिळवलं. हैदराबादनं 8 विकेटनं विजय मिळवला. हैदराबादनं आयपीएलच्या इतिहासातील सर्वात दुसरी सर्वाधिक धावसंख्या यशस्वीपणे पार केली. सनरायजर्स हैदराबादला यंदाच्या आयपीएलमध्ये पहिल्या सामन्यातील विजयानंतर सलग चार सामन्यांमध्ये पराभव स्वीकारावा लागला होता. आता पंजाबला नमवत हैदराबादनं दुसऱ्या विजयाची नोंद केली. यामुळं हैदराबादचा संघ आयपीएलच्या गुणतालिकेत 8 व्या स्थानावर पोहोचला आहे.




















