मुंबई इंडियन्सचं आयपीएलमधील आव्हान संपुष्टात
एबीपी माझा वेब टीम | 20 May 2018 08:40 PM (IST)
मुंबई इंडियन्सला अखेरच्या साखळी सामन्यात दिल्ली डेअरडेव्हिल्सकडून अकरा धावांनी पराभव स्वीकारावा लागला.
मुंबई : रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सचं आयपीएलमधलं आव्हान अखेर साखळीतच संपुष्टात आलं. मुंबई इंडियन्सला अखेरच्या साखळी सामन्यात दिल्ली डेअरडेव्हिल्सकडून अकरा धावांनी पराभव स्वीकारावा लागला. दिल्लीकडून झालेल्या या पराभवामुळंच मुंबईचं आयपीएलमधलं आव्हान संपुष्टात आलं. या सामन्यात दिल्लीनं मुंबईला विजयासाठी 175 धावांचं आव्हान दिलं होतं. पण संदीप लमिछाने आणि अमित मिश्रा या लेग स्पिनर्सनी मुंबईचा अख्खा डाव 163 धावांत गुंडाळला. लमिछानेनं 36 धावांत तीन, तर मिश्रानं 19 धावांत तीन फलंदाजांना माघारी धाडलं. त्याआधी रिषभ पंत आणि विजय शंकर यांच्या चमकदार फलंदाजीनं दिल्लीला चार बाद 174 धावांची मजल मारून दिली होती. पंतनं 64 धावांची, तर विजय शंकरनं नाबाद 43 धावांची खेळी केली.