PBKS vs DC, Innings Highlights: शिखर धवन आणि पृथ्वी शॉच्या शानदार खेळीच्या बळावर दिल्लीनं पुन्हा विजयाचं शिखर पार केलं. दिल्लीनं पंजाबवर सात विकेट्सने मात केली. पंजाबनं दिलेल्या 167 धावांचं आव्हान दिल्लीनं 18 व्या ओव्हरमध्येच पार केलं. 167 धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या दिल्लीच्या शिखर धवन आणि पृथ्वी शॉनं दिल्लीला चांगली सुरुवात करुन दिली. पॉवरप्लेमध्ये 60 च्या वर धावा दोघांनी जमवल्या. 


पृथ्वी शॉनं 22 चेंडूत 3 चौकार आणि 3 षटकारांच्या सहाय्यानं 39 धावा केल्या. पृथ्वी बाद झाल्यानंतर आलेल्या स्टीव्ह स्मिथनं 24 धावा केल्या. स्मिथ बाद झाल्यानंतर आलेल्या ऋषभ पंतनं 14 धावा केल्या. तर शेवटी आलेल्या हेटमायरनं चार चेंडूत 16 धावा केल्या. शिखर धवननं नाबाद 69 धावा केल्या. त्यानं आपल्या खेळीत 2 षटकार आणि 6 चौकार लगावले. 


त्याआधी केएल राहुलच्या जागी कर्णधारपदाची धुरा सांभाळणाऱ्या मयंक अग्रवालच्या शानदार नाबाद 99 धावांच्या बळावर पंजाबनं दिल्लीला 167 धावांचं आव्हान दिलं होतं.  सलामीवीर प्रभासिमरन सिंह 12 धावांवर बाद झाला. त्यानंतर आलेला ख्रिस गेल केवळ 13 धावा करु शकला. यानंतर डेविड मलान आणि मयांकनं डाव सावरला. मलान 26 धावांवर बाद झाला. त्यानंतर आलेला दीपक हुडा केवळ एका धावेवर बाद झाला. 


त्यानंतर आलेला शाहरुख खान 4 तर ख्रिस जॉर्डन 2 धावांवर बाद झाले. मयांकनं शेवटपर्यंत एका बाजूने खिंड लढवली. त्याने नाबाद 99 धावा केला. त्याने 58 चेंडूत 8 चौकार आणि 4 षटकार ठोकले.  दिल्लीकडून कगिसो रबाडानं तीन विकेट घेतल्या तर आवेश खान, अक्षर पटेलनं एक एक विकेट घेतली.