IPL 2021: दिल्ली कॅपिटल्सचा वेगवान गोलंदाज  एनरिच नॉटेजेला कोरोनाची लागण झाली आहे. त्याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आला असल्याची माहिती मिळाली आहे. एनरिच नॉटेजे चेन्नईविरोधातील पहिल्या सामन्यात खेळला नव्हता कारण तो त्यावेळी क्वारंटाईन होता. नॉर्टजेने मागील वर्षी दिल्लीकडून खेळताना शानदार प्रदर्शन केलं होतं. त्यानं 16 सामन्यांमध्ये 22 विकेट घेतल्या होत्या. तसंच  राजस्थानविरोधात त्यानं 156.22 किमी गतीनं एक चेंडू फेकला होता. जो आयपीएलच्या इतिहासातील आतापर्यंतचा सर्वात वेगवान चेंडू ठरला होता. 


आधी संघाचा ऑलराऊंडर अक्षर पटेल आणि आता नॉटेजेला कोरोनाची लागण झाल्यानं दिल्लीला मोठा झटका बसला आहे. नॉटेजेनं नुकतंच पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेत सहभाग घेतला होता. तिथून तो आफ्रिकेवरुन भारतात आला होता. भारतात आल्यापासून तो क्वारंटाईन होता. कगिसो रबाडा देखील नॉर्टजेसोबतच भारतात आला होता. 


 इंडियन प्रीमियर लीगच्या 14व्या सीझनच्या दुसऱ्या सामन्यात दिल्लीने चेन्नईवर मात करत दणदणीत विजय मिळवला होता.  या सामन्यानंतर दिल्लीचा स्टार गोलंदाज इशांत शर्माला दुखापत झाली असल्याचं समोर आलं होतं. चेन्नई विरुद्धच्या सामन्यात दिल्लीचा संघ स्टार गोलंदाज इशांत शर्माशिवाय मैदानात उतरला. इशांत शर्माऐवजी आवेश खानला संघात पाहून सर्वचजण हैराण झाले होते. परंतु, सामन्यानंतर इशांत शर्माला दुखापत झाल्याची माहिती समोर आली होती. 


दिल्ली कॅपिटल्सचा सहाय्यक कोच मोहम्मद कैफने इशांत शर्माच्या फिटनेसबाबत माहिती दिली. कैफ म्हणाला की, "इशांत शर्मा दुखापतग्रस्त आहे. जर तो फिट झाला असता, तर चेन्नई विरुद्धच्या सामन्यात त्याचा समावेश करण्यात येणार होता. परंतु, इशांत शर्मा दुखापतीतून सावरू न शकल्यामुळे संघात आवेश खानचा समावेश करावा लागला."