मुंबई : चेन्नई सुपरकिंग्सला मुंबई इंडियन्सवर सनसनाटी विजय मिळवून देणारा अष्टपैलू केदार जाधवला मांडीच्या दुखापतीमुळे आयपीएलच्या यंदाच्या मोसमातून माघार घ्यावी लागली आहे. मात्र केदारच्या जागी ऑलराऊंडर डेव्हिड विलीला संघात स्थान देण्यात आलं आहे.

मुंबईविरुद्धच्या सामन्यात केदार दुखापत घेऊनच अखेरच्या षटकात पुन्हा फलंदाजीला उतरला होता. कौतुकाची गोष्ट म्हणजे अशा परिस्थितीतही केदारने अखेरच्या षटकात सिक्सर ठोकून चेन्नईला मुंबईवर रोमांचक विजय मिळवून दिला होता. केदारची ती दुखापत गंभीर असल्याची माहिती चेन्नईचे प्रशिक्षक मायकल हसी यांनी दिली आहे.

आयपीएल सुरु होण्यापूर्वीच मिशेल सँटनरने चेन्नई संघाला निरोप दिला होता. दोघांची रिप्लेसमेंट म्हणून डेव्हिल विली संघात दाखल झाला आहे.


डेव्हिड विली यॉकशायर काऊंटी क्रिकेट क्लबच्या वतीने खेळतो. तो इंग्लंडचे माजी क्रिकेटपटू आणि अंपायर पीटर विली यांचा मुलगा आहे. डेव्हिडने 147 टी20 सामन्यांमध्ये दोन शतकं आणि सात अर्धशतकं लगावली आहेत. त्यामुळे धोनीच्या नेतृत्वात विली चेन्नई सुपरकिंग्ससाठी काय कमाल दाखवतो, याची क्रीडारसिकांना उत्सुकता आहे.