मुंबई: आयपीएलच्या आगामी मोसमात चेन्नई सुपर किंग्जच्या पुनरागमनामुळे चाहते खुश झाले आहेत, मात्र त्याचवेळी बीसीसीआयच्या नव्या नियमांमुळे काहीशी निराशा आहे.


आयपीएलला दहा वर्ष पूर्ण झाल्यानंतर, आता नव्या मोसमात पुन्हा खेळाडूंची नव्याने बोली लागणार आहे, त्याचमुळे प्रत्येक टीमची डोकेदुखी वाढली आहे.

नव्या हंगामात एक टीम केवळ तीन खेळाडूंनाच संघात कायम ठेवू शकते.

तिकडे तामिळनाडूतील स्थानिक मीडियात, धोनीच चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार म्हणून पुनरागमन करेल अशी चर्चा आहे.

मात्र धोनीचा साथीदार आणि आयपीएलमधील मोठा खेळाडू सुरेश रैनाला यावेळी कोणत्या तरी दुसऱ्याच संघातून खेळावं लागणार आहे. रैना 8 वर्षे सीएसकेकडून खेळला.

IPL 2018: धोनी तिघांना संघात ठेवणार, मग रैनाचं काय होणार?

सूत्रांच्या मते, नव्या नियमानुसार चेन्नई सुपर किंग्ज आपल्या संघात धोनी, आर अश्विन आणि एक विदेश खेळाडू फॅफ ड्युप्लेसी यांना कायम ठेवणार आहेत.

मात्र मीडियातील बातम्यांनंतर चेन्नई सुपर किंग्जने हे वृत्त फेटाळत स्पष्ट केलं की, त्यांना रैनाच नव्हे तर पूर्ण टीमची गरज आहे.

सीएसकेने याबाबत आपल्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवर माहिती दिली आहे. त्यानुसार, "सध्या सोशल मीडियावर चिन्नाथालाला (सुरेश रैना) संघात घेऊ इच्छित नाही अशा अफवा पसरत आहेत. मात्र या अफवांवर विश्वास ठेवू नका. आम्ही स्वाभिमानी संघ पुन्हा एकसाथ पाहू इच्छित आहे", असं म्हटलं आहे.

https://twitter.com/ChennaiIPL/status/930421164488368129

या ट्विटमुळे सीएसके रैनासाठी सकारात्मक आहे असं दिसतं. मात्र नव्या नियमानुसार चेन्नई सुपर किंग्जमध्ये कोणत्या तीन खेळाडूंना स्थान मिळणार हे अद्याप अस्पष्टच आहे.

चेन्नई आणि राजस्थान रॉयल्स या दोन संघांवर दोन वर्षांची बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर आता ते पुन्हा पुनरागमन करत आहेत.