ब्रिस्बेन: ऑस्ट्रेलियाचा उपकर्णधार आणि सलामीचा फलंदाज डेव्हिड वॉर्नर हा मानेच्या दुखापतीतून सावरला आहे. त्यामुळं इंग्लंडविरुद्धच्या अॅशेस मालिकेतल्या ब्रिस्बेनच्या पहिल्या कसोटीत वॉर्नर खेळू शकेल, असा विश्वास ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथनं व्यक्त केला आहे.

वेळ पडली तर वेस्ट इंडिजच्या शिवनारायण चंदरपॉलच्या शैलीनं (साईड ऑन स्टान्सनं) फलंदाजी करण्याची वॉर्नरची तयारी आहे, पण ब्रिस्बेन कसोटीच्या रणांगणात तो नक्की उतरेल, या शब्दांमध्ये स्मिथनं वॉर्नरचा आत्मविश्वास बोलून दाखवला.

पहिल्या कसोटीसाठी मंगळवारी गाबावर उंच झेलांचा सराव करताना वॉर्नरची मान दुखावली होती. त्यामुळं तो पहिल्या कसोटीत खेळू शकेल का, याविषयी शंका व्यक्त करण्यात येत होती. पण गेल्या चोवीस तासांच्या विश्रांतीमुळं वॉर्नर दुखापतीतून सावरत असल्याचं दिसून येत आहे. पुढच्या चोवीस तासांत त्याचं दुखणं आणखी कमी होईल, असा विश्वास स्मिथला आहे.

'क्रिकेट ऑस्ट्रेलिया'च्या निवड समिती सदस्यांनी वॉर्नरच्या पर्यायांना ब्रिस्बेन कसोटीसाठी सज्ज राहायला सांगितलं होतं. पण वॉर्नरचा या कसोटी खेळण्याबाबत आत्मविश्वास इतका मोठा आहे की, त्यानं बदली खेळाडूंची गरज भासणार नाही असं म्हटलं आहे.

ऑस्ट्रेलियानं चाड सेयर्स आणि जॅकसन बर्ड अकराजणांच्या अंतिम संघातून वगळण्याचा निर्णय घेतला आहे.

ब्रिस्बेन कसोटीसाठीचा ऑस्ट्रेलिया संघ : स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, कॅमेरॉन बॅन्क्रॉफ्ट, उस्मान ख्वाजा, पीटर हॅण्ड्सकोम्ब, शॉन मार्श, टीम पेन, मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स, जोश हेझलवूड आणि नॅथन लायन

स्पोर्टस डेस्क, एबीपी माझा