टीम इंडियानं वेलिंग्टनच्या पाचव्या वन डेत न्यूझीलंडला विजयासाठी 253 धावांचं आव्हान दिलं होतं. या सामन्यात भारतीय संघानं 50 षटकांत सर्वबाद 252 बाद धावांची मजल मारली होती. अंबाती रायुडूनं विजय शंकरच्या साथीनं 98 धावांची आणि केदार जाधवच्या साथीनं 74 धावांची भागीदारी रचून भारताच्या डावाची उभारणी केली होती. शेवटी हार्दिक पंड्याने केलेल्या जोरदार फटकेबाजीमुळे भारताच्या डावाला आकार मिळाला होता.
या सामन्यात न्यूझीलंडच्या हेन्री निकोलस आणि ट्रेण्ट बोल्टनं टीम इंडियाची चार बाद 18 अशी दाणादाण उडवली होती. त्या कठीण परिस्थितीत अंबाती रायुडू आणि विजय शंकरनं संयमानं खेळ करून भारतीय डावाला आकार दिला होता. विजय शंकरचं अर्धशतक पाच धावांनी, तर रायुडूचं शतक दहा धावांनी हुकलं. रायुडूनं नव्वद धावांच्या खेळीला आठ चौकार आणि चार षटकारांचा साज चढवला. त्याला विजय शंकरने 45 तर केदार जाधवने 34 धावांची खेळी करत चांगली साथ दिली. शेवटी हार्दिक पंड्याने 22 चेंडूत 2 चौकार आणि 5 षटकारांसह 45 धावांची खेळी केली होती.
दरम्यान, न्यूझीलंड दौऱ्यातील पाचव्या वन डे सामन्यात टीम इंडियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. सलामीवीर रोहित शर्मा 2 तर शिखर धवन 6 धावांवर बाद झाले. तर यांनतर आलेल्या शुभमन गिल (7) आणि महेंद्रसिंग धोनीला (1) देखील मोठी खेळी करता आली नाही. या सामन्यात महेंद्रसिंह धोनी तंदुरुस्त झाल्याने दिनेश कार्तिकच्या जागी त्याला संधी देण्यात आली होती. तर खलीलच्या जागी मोहम्मद शमी आणि कुलदीप यादवच्या जागी विजय शंकरला खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
टीम इंडियानं सुरुवातीचे लागोपाठ तीन सामने जिंकून पाच सामन्यांची मालिका आधीच खिशात घातली होती. पण हॅमिल्टनच्या चौथ्या वन डेत न्यूझीलंडनं भारताचा आठ विकेट्सनी धुव्वा उडवला. त्या वन डेत किवी गोलंदाजांनी टीम इंडियाचा अवघ्या 92 धावांत खुर्दा उडवून, भारतीय फलंदाजांची अब्रू वेशीवर टांगली होती. हॅमिल्टनच्या त्याच लाजिरवाण्या पराभवाचा वचपा काढला.