INDvsENG 3rd Test : टीम इंडिया आणि इंग्लंडदरम्यान सुरु असलेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसऱ्या सामन्याला आजपासून लीड्सवर सुरुवात होणार आहे. दमदार फॉर्ममध्ये असलेल्या टीम इंडियाचा ही कसोटी जिंकत आघाडी घेण्याचा निर्धार आहे तर इंग्लंडचा संघ हा सामना जिंकून मालिकेत बरोबरी करण्याच्या निर्धारासह उतरणार आहे. 


या सामन्यात विशेष लक्ष असेल ते म्हणजो भारतीय कर्णधार विराट कोहलीकडे. कारण अजूनही विराटला लय सापडलेली नाही.  लीड्सवर छाप पाडण्यासाठी उत्सुक आहे. भारताकडून रोहित शर्मा आणि के. एल. राहुल या सलामीवीरांची कामगिरी सरस ठरली आहे. या दोघांचा भन्नाट फॉर्म टीम इंडियासाठी फायद्याचा ठरत आहे. असं असलं तरी मधल्या फळीचा फॉर्म हा भारतासाठी चिंतेचा विषय आहे.  चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांचे अपयश भारतासाठी चिंताजनक आहे.   भारताकडून आज रविचंद्रन अश्विनला संधी मिळण्याची शक्यता आहे. दुसरीकडे शार्दूल ठाकूर दुखापतीतून बाहेर आला असला तरी इशांत शर्माच्या लॉर्ड्सवरील कामगिरीमुळं त्याला संधी मिळण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळं इशांत शर्मा, मोहम्मद शामी, सिराज आणि बुमराह या वेगवान चौकडीसहच टीम इंडिया मैदानात उतरण्याची शक्यता आहे. 


दुसरीकडे इंग्लंडकडूनही जो रुट वगळता अन्य कुणाला चांगला फॉर्म गवसलेला नाही. त्यात इंग्लंडला  मार्क वूडच्या दुखापतीमुळे मोठा फटका बसलाय, वूडच्या जागी साकिब मेहमूदला पदार्पणाची संधी मिळू शकते. अनुभवी जेम्स अँडरसन तंदुरुस्त असल्याचं रुटनं सांगितलं आहे.  डेव्हिड मलानचा देखील इंग्लंड संघात प्रवेश झालाय. त्यामुळं त्याच्याकडून देखील इंग्लंडला मोठ्या अपेक्षा आहेत.  


भारतीय संघ : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, मयांक अगरवाल, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रित बुमरा, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, के. एल. राहुल, वृद्धिमान साहा, अभिमन्यू ईश्वरन, पृथ्वी शॉ, सूर्यकुमार यादव.


इंग्लंडचा संघ : जो रूट (कर्णधार), मोईन अली, जेम्स अँडरसन, जोनाथन बेअरस्टो, रॉली बन्र्स, जोस बटलर (यष्टीरक्षक), सॅम करन, हसीब हमीद, डॅन लॉरेन्स, साकिब मेहमूद, डेव्हिड मलान, क्रेग आव्हर्टन, ऑली पोप, ऑली रॉबिन्सन.


कुठे पाहाल सामना 
हा सामना भारतीय वेळेनुसार आज दुपारी 3.30 वाजता सुरु होईल. सोनी सिक्स, सोनी टेन 3 वाहिनीवर याचे लाईव्ह प्रक्षेपण होईल.