मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी हरमनप्रीत कौरच्या वर्दीवर स्टार लावले. महिला विश्वचषक 2017 मध्ये शानदार कामगिरीनंतर मुख्यमंत्र्यांनी मागील वर्षी जुलै महिन्यात हरमनप्रीतला डीएसपी पदाची ऑफर दिली होती.
हरमनप्रीतने पश्चिम रेल्वेमध्ये कार्यालय अधीक्षक म्हणून तीन वर्ष पूर्ण केले होते. तिने मागील वर्षी रेल्वेच्या नोकरीचा राजीनामा दिला होता. यानंतर भारतीय रेल्वेने हरमनप्रीतला पदातून मुक्त केलं. कारण हरमनप्रीत कौरला पंजाब पोलिसात काम करायचं होतं.
मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनीही हे प्रकरण रेल्वे मंत्रालयासमोर उपस्थित केलं होतं. हरमनप्रीतला पदमुक्त करण्यासाठी तिच्या बॉण्डमधील शर्थी आणि अटींमध्ये सूट देण्याची विनंती केली होती.
खरंतर पंजाब पोलिसात डीएसपी पदासाठी तिची वैद्यकीय चाचणी आधीच पूर्ण झाली होती. पण भारतीय रेल्वेने तिला पदमुक्त केलं नव्हतं, त्यामुळे ती पंजाब पोलिसात रुजू झाली नव्हती.
परंतु भारतीय रेल्वेने हरमनप्रीतला तिला पदातून मुक्त केल्यानंतरच हे शक्य झालं. एकेकाळी पंजाब पोलिसांनी हरमनप्रीतला नोकरी देण्यास नकार दिला होता.