Rahul Chahar: भारतीय फिरकीपटू राहुल चहरने इशिनी जोहरसोबतचा घटस्फोट घेतल्याचं जाहीर केलं आहे. त्यांचा विवाह कायदेशीररित्या संपल्याचे अधिकृतपणे जाहीर केल्याने टीम इंडियातील आणखी एका क्रिकेटरचा संसार मोडला आहे. मार्च 2022 मध्ये गोव्यात मोठ्या थाटामाटात त्यांचा विवाह झाला होता, मात्र तीन वर्षांनंतर हा प्रवास आता थांबला आहे. राहुलने इन्स्टाग्राम नोटमध्ये भावना व्यक्त केल्या आहेत.
15 महिने कोर्टाच्या चकरा मारल्या
राहुल म्हणतो की, खूप लवकर, म्हणजे खूप तरुण वयात लग्नाचा निर्णय घेतला होता. तो म्हणतो, "त्यावेळी मला स्वतःची पूर्ण समज नव्हती. मला नेमकं काय हवं आहे, माझी मूल्ये काय आहेत आणि मला कोणत्या प्रकारचे आयुष्य घडवायचे आहे, हे मला नीट समजले नव्हते. घटस्फोटाची ही प्रक्रिया सोपी नव्हती. राहुलने सांगितले की, गेले 15 महिने तो कोर्टाच्या चकरा मारत होता. त्याने या काळाचे वर्णन भावनिकदृष्ट्या थकवणारे असे केले आहे, परंतु याच काळात त्याला संयम आणि लवचिकता शिकायला मिळाली. तो पुढे म्हणतो, हा एक असा धडा (chapter) होता जो कायम टिकण्यासाठी नव्हता, तर तो काहीतरी शिकवण्यासाठी आणि स्वतःमध्ये बदल घडवण्यासाठी होता. त्याने कोणावरही आरोप किंवा चिखलफेक केलेली नाही.
राहुल चहर चेन्नई सुपर किंग्सकडून खेळणार
या सर्व कायदेशीर प्रक्रियेसाठी खूप मोठी किंमत मोजावी लागली. याचा अर्थ केवळ आर्थिक नव्हे, तर भावनिक ताण असाही होतो, असे तो म्हणाला. तो म्हणतो की, त्याला आता असे आयुष्य जगायचे आहे जे स्वाभिमान, शांती आणि चांगल्या निवडींवर आधारित असेल. राहुल चहर सध्या 26 वर्षांचा असून तो व्यावसायिक क्रिकेटवर लक्ष केंद्रित करत आहे. तो सध्या आयपीएलच्या आगामी हंगामासाठी चेन्नई सुपर किंग्सकडून खेळण्यासाठी सज्ज होत आहे.
हार्दिक पांड्या, शिखर धवन, चहलचाही घटस्फोट
दरम्यान, गेल्या काही महिन्यांमध्ये टीम इंडियामधील क्रिकेटरांच्या वैयक्तिक आयुष्यात वादळ सुरुच आहे. हार्दिक पांड्या, माजी सलामीवीर शिखर धवन तसेच फिरकी गोलंदाज युझवेंद्र चहल यांचाही घटस्फोट झाला आहे. हार्दिकने माहिरा शर्माशी नव्याने आयुष्य सुरु केलं आहे. चहलच्या घटस्फोटानंतर पुन्हा आरजेसोबत सूत जुळल्याची चर्चा होती, पण तिथंही वादळ आल्याची चर्चा आहे. शिखर धवनने दुसरी इनिंग सुरु करताना पुन्हा विदेशी गर्लफ्रेंडशी लग्न केलं आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
