जकार्ता : एशियाड स्पर्धेत सलग पाचव्या दिवसाची सुरुवात पदकांनी झाली आहे. दिवसाच्या सुरुवातीला भारताची टेनिसपटू अंकिता रैनाने कांस्यपदकाची कमाई केली आहे. तर भारताचा पंधरा वर्षांचा नेमबाज शार्दूल विहाननं रुपेरी यश मिळवलं आहे.
अंकिता रैनाची कांस्यपदकाची कमाई
स्पर्धेतच्या पाचव्या दिवसाच्या सुरुवातीला भारताची टेनिसपटू अंकिता रैनाने कांस्यपदकाची कमाई केली आहे. महिला टेनिसच्या उपांत्य फेरीत अंकिताला चीनच्या झ्यांग शुईकडून पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवामुळे अंकिताला कांस्यपदकावर समाधान मानावं लागणार आहे. शुईने रैनावर 4-6, 7-6 अशी मात करत अंतिम फेरीत प्रवेश मिळवला होता.
शार्दुल विहानला रौप्य पदक
एशियाड स्पर्धेत पाचव्या दिवशी भारताच्या अजून एका पदकाची भर पडली आहे. भारताचा पंधरा वर्षांचा नेमबाज शार्दुल विहाननं रुपेरी यश मिळवलं आहे. मूळच्या मेरठच्या शार्दुलनं डबल ट्रॅप नेमबाजीत रौप्यपदकाची कमाई केली.
जपानचा शिन ह्यूनवू आणि शार्दुलमध्ये सुवर्णपदकासाठी अतिशय चुरशीची स्पर्धा दिसून आली. अखेर अनुभवी शिन ह्यूनवूनं सुवर्णपदकाच्या शर्यतीत बाजी मारली. त्यामुळे शार्दुलला रौप्यपदकावर समाधान मानावं लागलं. पण त्याची ही कामगिरी भविष्याच्या दृष्टीनं अपेक्षा उंचावणारी मानली जात आहे.
भारतीय महिला कबड्डी संघाचं रौप्य पदक निश्चित
एशियाड स्पर्धेत भारतीय महिला कबड्डी संघाने अंतिम फेरीत धडक मारली आहे. उपांत्य सामन्यात भारतीय महिलांनी चीन चैपेईचा 27-14 ने पराभव केला. महिला कबड्डी संघाच्या या विजयानं भारताचं पदक निश्चित झालं आहे.
भारताने जर अंतिम सामना जिंकल्यास भारत सुवर्ण पदकावर आपले नाव कोरेल. पण हा सामना गमवल्यास भारताला रौप्य पदकावर समाधान मानावं लागेल.
टेनिसमध्ये पुरुषांच्या दुहेरी प्रकारात रौप्यपदक निश्चित
टेनिसमध्ये पुरुषांच्या दुहेरी प्रकारात भारताची रोहन बोपण्णा आणि दिवीज शरण जोडी अंतिम फेरीत पोहचली आहे. अटीतटीच्या लढतीत बोपण्णा-शरण जोडीने जपानच्या प्रतिस्पर्धी जोडीवर 4-6, 6-3, 10-8 अशी मात केली. या विजयामुळे भारताच्या खात्यात रौप्यपदक निश्चित झालं आहे.
Asian Games 2018: शार्दुल विहानला रौप्य तर अंकिता रैनाला कांस्य
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
23 Aug 2018 04:10 PM (IST)
टेनिसमध्ये पुरुषांच्या दुहेरी प्रकारात भारताची रोहन बोपण्णा आणि दिवीज शरण जोडी अंतिम फेरीत पोहचली आहे. तर भारतीय महिला कबड्डी संघाने अंतिम फेरीत धडक मारली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -