मेरी कोमचे जागतिक बॉक्सिंग स्पर्धेतले हे सहावे सुवर्णपदक असून, आजवरच्या इतिहासातली ती सर्वात यशस्वी बॉक्सर ठरली आहे. तिने अंतिम फेरीत युक्रेनच्या हॅना ओखोटाचा 5-0 असा पराभव केला.
फायनलमध्ये मेरीचा आक्रमक अवतार पहायला मिळाला. सामन्याच्या पहिल्या फेरीपासून तिने जोरदार आक्रमणाला सुरुवात केली. पहिल्या फेरीत तिने ओखोटाला हतबल केले होते. पहिल्या फेरीतल्या आक्रमणामुळे तिला आघाडी मिळाली. त्यामुळे सामन्याच्या शेवटपर्यंत ओखोटा दबावात होती. याचाच फायदा मेरीने घेतला.
मेरी कोमने याआधी 2002, 2005, 2006, 2008 आणि 2010 सालच्या जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली होती. 2001 सालच्या जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत तिला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले होते. 2012 सालच्या लंडन ऑलिम्पिकमध्ये मेरी कोम कांस्यपदकाची मानकरी ठरली होती.