केपटाऊन : भुवनेश्वर कुमारच्या प्रभावी माऱ्याने केपटाऊनच्या ट्वेन्टी 20 सामन्यात टीम इंडियाला दक्षिण आफ्रिकेवर सात धावांनी रोमांचक विजय मिळवून दिला. भारताने या विजयासह तीन ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांची मालिका 2-1 अशी जिंकली.


टीम इंडियानं दक्षिण आफ्रिका दौऱ्यातली वन डे सामन्यांची मालिका 5-1 ने जिंकली होती. त्यापाठोपाठ ट्वेन्टी 20 सामन्यांची मालिकाही खिशात घालण्याचा पराक्रम भारतानं गाजवला.

केपटाऊनच्या सामन्यात भारतानं दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 173 धावांचं आव्हान दिलं होतं. भुवनेश्वरनं चार षटकांत केवळ 24 धावा देऊन दोन फलंदाजांना माघारी धाडलं. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेला वीस षटकांत सहा बाद 165 धावांचीच मजल मारता आली.

त्याआधी, शिखर धवननं 47 आणि सुरेश रैनानं 43 धावांची खेळी करुन भारताला सात बाद 172 धावांची मजल मारुन दिली होती.
धवन आणि रैनानं दुसऱ्या विकेटसाठी रचलेली 65 धावांची भागीदारी हेच भारताच्या डावाचं वैशिष्ट्य ठरलं. त्यानंतर भारतीय फलंदाजांना धावगती उंचावण्यात यश आलं नाही.

धवनने 40 चेंडूंत तीन चौकारांसह 47 धावांची खेळी उभारली. त्यानं रैनाच्या साथीनं 65 धावांची आणि पांडेच्या साथीनं 32 धावांची भागीदारी रचली. रैनानं 27 चेंडूंत पाच चौकार आणि एका षटकारासह 43 धावांची खेळी उभारली.