हैदराबाद : रॉस्टन चेस आणि जेसन होल्डरनं सातव्या विकेटसाठी रचलेल्या झुंजार भागिदारीनं हैदराबाद कसोटीत वेस्ट इंडिजच्या पहिल्या डावाला मजबुती दिली. या कसोटीत विंडीजनं पहिल्या दिवसअखेर सात बाद 294 धावांची मजल मारली आहे.
विंडीजच्या प्रमुख फलंदाजांनी याही कसोटीत भारतीय आक्रमणासमोर नांगी टाकली होती. पण चेस आणि होल्डरनं सातव्या विकेटसाठी 104 धावांची भागीदारी रचून विंडीजचा डाव सावरला. होल्डरनं कसोटी कारकीर्दीतलं आठवं अर्धशतक झळकावलं.
होल्डरनं सहा चौकारांसह 52 धावांची खेळी उभारली. रॉस्टन चेस चौथ्या कसोटी शतकाच्या उंबरठ्यावर आहे. त्यानं सात चौकार आणि एका षटकारासह नाबाद 98 धावांची खेळी केली.
हैदराबाद कसोटीच्या पहिल्या दिवशी भारतीय गोलंदाजांना संमिश्र यश लाभलं. रॉस्टन चेस आणि जेसन होल्डर यांनी निर्धारानं फलंदाजी करून भारतीय गोलंदाजांना पहिल्या दिवसावर निर्विवाद वर्चस्व गाजवू दिलं नाही. पण उमेश यादव आणि कुलदीप यादवनं प्रत्येकी तीन फलंदाजांना माघारी धाडून पहिल्या दिवसाच्या खेळावर भारताचं नियंत्रण राखलं.
उमेश यादवनं 83 धावांत तीन, तर कुलदीप यादवनं 74 धावा देत तीन विकेट्स घेतल्या. रवीचंद्रन अश्विननं एक विकेट्स घेतली, तर रवींद्र जाडेजा दिवअखेर रिकाम्या हातानं माघारी परतला.
मुंबईच्या शार्दूल ठाकूरला हैदराबादच्या मैदानात कसोटी पदार्पणाची संधी मिळाली, पण त्याचं कसोटी पदार्पण हे दु:स्वप्न ठरलं. वेस्ट इंडिजविरुद्धच्या या कसोटीत शार्दूलला अवघे दहा चेंडू टाकून ड्रेसिंगरूममध्ये परतावं लागलं. त्याला जांघेतल्या दुखापतीमुळं गोलंदाजी करत राहणं असह्य ठरलं होतं. त्यामुळे कर्णधार विराट कोहली आणि फिजिओ पॅट्रिक फरहात यांच्याशी सल्लामसलत करून शार्दूल माघारी परतला.
शार्दुलच्या पाठी लागलेल्या दुखापती टीम इंडियासाठी चिंतेची बाब ठरली आहे. आशिया चषकातल्या सलामीच्या सामन्यानंतर त्यानं स्नायू दुखावल्याची तक्रार केली होती. त्यामुळं शार्दूलला मायदेशी पाठवण्यात आलं होतं.