विशाखापट्टणम : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरा एकदिवसीय बरोबरीत सुटला आहे. विराट कोहलीच्या 37 वं शतक आणि 10 हजार धावांच्या विश्वविक्रमावर भारतीय गोलंदाजांनी पाणी फेरलं आहे. प्रथम फलंदाजीला उतरलेल्या टीम इंडियानं विंडीजसमोर 321 धावांचा डोंगर उभारला होता.
भारतीय गोलंदाजांच्या निराशजनक गोलंदाजीमुळे विराटच्या शतकाला विजयाचं सुख लाभलं नाही.. वेस्ट इंडिजकडून शाय होपनं झुंझार शतक झळकावलं. होपनं 134 चेंडूत 123 धावा ठोकल्या. तर शिमरॉन हेतमायरचं शतक अवघ्या सहा धावांनी हुकलं. हेतमायरनं अवघ्या 64 चेंडूंत 94 धावांची जलद तडाखेबाज खेळी केली.
शाय होपनं अखेरच्या चेंडूवर ठोकलेल्या चौकारानं वेस्ट इंडिजला विशाखापट्टणमची वन डे टाय करून दिली. या सामन्यात विंडीजला अखेरच्या दोन चेंडूंवर विजयासाठी सात धावांची आवश्यकता होती. शाय होपनं पाचव्या चेंडूवर दोन धावा आणि सहाव्या चेंडूवर चौकार वसूल केला. त्यामुळं हा सामना बरोबरीत सुटला. विंडीजच्या या कामगिरीचं श्रेय शाय होपच्या शतकाला आणि शिमरॉन हेटमायरच्या 94 धावांना जातं.
भारताकडून उमेश यादवनं 10 षटकांत सर्वाधिक 78 धावा दिल्या. फिरकीपटू कुलदीप यादवने सामन्यात 3 विकेट घेतल्या, मात्र त्यासाठी त्याला 10 षटकांत 67 धावा खर्च कराव्या लागल्या.
त्याआधी, या सामन्यात विराट कोहलीच्या नाबाद 157 धावांच्या खेळीच्या जोरावर भारतानं 50 षटकांत सहा बाद 321 धावांची मजल मारली. भारतीय कर्णधार विराट कोहलीनं 129 चेंडूंमधली नाबाद 157 धावांची खेळी तेरा चौकार आणि चार षटकारांनी सजवली.
विराटनं या खेळीदरम्यान आपल्या शिरपेचात मानाचे दोन नवे तुरे खोवले. त्यानं वन डे कारकीर्दीतलं 37 वं शतक साजरं केलं. तर वन डेत सर्वाधिक शतकांच्या शर्यतीत विराट आता दुसऱ्या स्थानावर आहे. वन डेत सचिनच्या खात्यात सर्वाधिक 49 शतकं आहेत.