नागपूर : सलामीचा मुरली विजय आणि चेतेश्वर पुजाराच्या दमदार शतकांनी टीम इंडियानं नागपूर कसोटीवर आपली पकड मजबूत केली आहे. टीम इंडियानं पहिल्या डावात 2 बाद 312 धावांची मजल मारत श्रीलंकेवर 107 धावांची भक्कम आघाडी घेतली आहे.
मुरली विजयनं कसोटी कारकीर्दीतलं दहावं शतक साजरं केलं. त्यानं 221 चेंडूंत 128 धावांची खेळी केली. यात त्याने 11 चौकार आणि एका षटकाराचा समावेश आहे. त्याचबरोबर पुजारानही २८४ चेंडूंत तेरा चौकारांसह नाबाद 121 धावांची खेळी उभारली.
पुजाराचं कारकीर्दीतलं हे 14 वं कसोटी शतक ठरलं. या दोघांनी मिळून दुसऱ्या विकेटसाठी 209 धावांची महत्वपूर्ण भागिदारी रचली.
त्यानंतर आलेल्या कर्णधार विराट कोहलीनंही नाबाद अर्धशतक झळकावताना टीम इंडियाला 300 धावंचा टप्पा ओलांडून दिला. दुसऱ्या दिवशीचा खेळ थांबला तेव्हा पुजारा 121 तर कर्णधार कोहली 54 धावांवर खेळत होते.
मुरली विजयचं खणखणीत शतक, टीम इंडिया मजबूत स्थितीत
सलामीचा मुरली विजय आणि चेतेश्वर पुजारानं दुसऱ्या विकेटसाठी रचलेल्या धावांच्या अभेद्य भागिदारीनं टीम इंडियाला नागपूर कसोटीवर पकड घेण्याची नामी संधी मिळवून दिली. दुसऱ्या दिवशी चहापानाला खेळ थांबला, त्या वेळी भारतानं एक बाद 185 धावांची दमदार मजल मारली होती. विजय 106 धावांवर, तर पुजारा 71 धावांवर खेळत आहे.
या दोघांनी दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या दोन्ही सत्रांमध्ये श्रीलंकेच्या आक्रमणावर निर्विवाद वर्चस्व गाजवलं. विजयनं कसोटी कारकीर्दीतलं दहावं शतकही साजरं केलं. त्यानं 194 चेंडूंत नाबाद 106 धावांची खेळी नऊ चौकार आणि एका षटकारानं सजवली.
पुजारानं 183 चेंडूंत 9 चौकारांसह नाबाद 71 धावांची खेळी उभारली. त्यामुळे सध्या टीम इंडियाची नागपूर कसोटीवर पकड मजबूत झाली आहे.
दरम्यान, काल भारतीय गोलंदाजांनी श्रीलंकेचा पहिला डाव अवघ्या 205 धावांत गुंडाळून, नागपूर कसोटी टीम इंडियाच्या बाजूने झुकवली. या कसोटीत श्रीलंकेने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी स्वीकारली होती.
त्यामुळे श्रीलंकेला फलंदाजांकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती. पण दिमुथ करुणारत्ने आणि दिनेश चंडिमलने चौथ्या विकेटसाठी केलेल्या 62 धावांच्या भागिदारीचा अपवाद वगळता श्रीलंकेच्या डावात मोठी भागीदारी झाली नाही. करुणारत्नेने 51, तर चंडिमलने 57 धावांची खेळी केली.