जोहान्सबर्ग : जोहान्सबर्ग कसोटीत कर्णधार विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारानं तिसऱ्या विकेटसाठी ८४ धावांची झुंजार भागीदारी रचूनही, टीम इंडियाचा पहिला डाव १८७ धावात आटोपला. विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा या दोघांनीही भारताच्या पहिल्या डावात अर्धशतक साजरं केलं.

विराटनं १०६ चेंडूंत नऊ चौकारांसह ५४ धावांची खेळी उभारली, तर पुजारानं १७९ चेंडूंत आठ चौकारांसह ५० धावांची खेळी केली. तळाला भुवनेश्वर कुमारनं ३० धावांची झुंजार खेळी केली. पण भारताच्या अन्य आठ फलंदाजांना मिळून अवघ्या २७ धावाच जमवता आल्या.

दोन कसोटी सामन्यानंतर संघात संधी देण्यात आलेल्या अजिंक्य रहाणेला देखील या सामन्यात फारशी काही चांगली कामगिरी करता आली नाही. तो अवघ्या 9 धावांवर बाद झाला. कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. पण त्याचा फायदा भारतीय फलंदाजांना घेता आला नाही.

दरम्यान, द. आफ्रिकेची देखील पहिल्या डावात अडखळती सुरुवात झाली आहे. सलामीवीर मार्करम अवघ्या दोन धावा करुन माघारी परतला. भुवनेश्वर कुमारने बाद केलं.