IND vs SL, 3rd ODI : कोलंबोच्या प्रेमादास स्टेडियमवर भारत आणि श्रीलंका यांच्यातील तिसरा आणि शेवटचा वनडे खेळला गेला. श्रीलंकेने तीन विकटने सामना जिंकला आहे. सलग दोन पराभवानंतर श्रीलंकेच्या संघाने  शेवटच्या सामन्यात विजय मिळवला आहे. अंतिम सामना गमावला तरी टीम इंडियाने 2-1 ने मालिका जिंकली आहे. या अंतिम सामन्यातील एक फोटो सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. यात भारताचे कोच राहुल द्रविड हे श्रीलंकेचा कर्णधार दसून शनाका याला काहीतरी सांगताना दिसत आहेत. द्रविड शनाकाला काहीतरी मार्गदर्शन करताना दिसत आहेत. हा फोटो अनेकांनी शेअर केला असून द्रविडचं कौतुक देखील होत आहे.


नेमकं काय घडलं
तिसऱ्या वनडेत टीम इंडिया प्रथम फलंदाजी करत असताना 23 व्या षटकानंतर पावसाचे आगमन झाल्याने खेळ तासाभरासाठी थांबवला. त्यावेळी भारताची धावसंख्या तीन बाद 147 झाली होती. पाऊस थांबल्यानंतर मैदानाचे निरीक्षण करण्यासाठी राहुल द्रविड मैदानात उतरला. त्याचवेळी श्रीलंकेचा कर्णधार दसून शनाका देखील मैदानात आला. द्रविडला पाहताच शनाका त्याच्याशी चर्चा करू लागला. द्रविडने देखील प्रतिस्पर्धी न मानता त्याला काही मार्गदर्शन केले. शनाका द्रविडच्या या सूचना अत्यंत नम्रपणे ऐकत असल्याचं या फोटोत दिसत आहे.






पावसानंतर सुरू झालेल्या सामन्यात श्रीलंकेनं 3 बाद 147 वरून भारताचा डाव 225 धावांवर संपुष्टात आणला. यावरुन सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी राहुल द्रविडचे कौतुक करायला सुरुवात केली. राहुल द्रविडच्या मार्गदर्शनामुळं श्रीलंका जिंकली का काय? असाही सवाल उपस्थित केला जात आहे.  


राहुल द्रविड यशस्वी कोच
राहुल द्रविडनं पहिल्यांदाच भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची धुरा श्रीलंकेच्या या दौऱ्यात सांभाळली. या दौऱ्यात एकदिवसीय मालिका टीम इंडियानं 2-1 अशी जिंकली आहे. आता टी 20 मालिकेकडे सर्वांचं लक्ष आहे. मात्र या विजयामुळं राहुल द्रविडचं प्रशिक्षक म्हणून कौतुक होऊ लागलं आहे. राहुल द्रविडच्या यशस्वी प्रशिक्षक पदावर याआधीही शिक्कामोर्तब झालं आहे. त्याच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडिया (A), अंडर 19 संघानं जोरदार कामगिरी केली आहे.


राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडिया  A (लिस्ट A)संघानं 64 सामने खेळले आहेत. यापैकी 44 सामन्यात संघानं विजय मिळवला आहे तर 16 सामन्यात पराभाव स्वीकारावा लागला आहे. या विजयाची टक्केवारी 68.75 इतकी आहे. तर टीम इंडिया A (FC) संघानं 33 सामने खेळले आहेत. यापैकी 14 सामन्यात संघानं विजय मिळवला आहे तर 5 सामन्यात पराभाव स्वीकारावा लागला आहे. तर 14 सामने अनिर्णित झाले आहेत. या विजयाची टक्केवारी 42.42 इतकी आहे. 


तर द्रविडच्या मार्गदर्शनाखाली इंडिया अंडर 19 संघानं एकदिवसीय सामन्यात जोरदार कामगिरी केली आहे. द्रविडच्या मार्गदर्शनाखाली खेळलेल्या 70 सामन्यांपैकी अंडर 19 संघानं 56 सामने जिंकले आहेत तर 12 सामने हरले आहेत. या विजयाची टक्केवारी 80 टक्के इतकी आहे. तर कसोटी सामन्यांमध्येही अंडर 19 संघानं द्रविडच्या मार्गदर्शनात चांगली कामगिरी केली आहे. आठपैकी सहा सामने जिंकले आहेत तर दोन सामने अनिर्णित राहिले आहेत. एकही कसोटी पराभव अंडर 19 संघाचा द्रविडच्या मार्गदर्शनात झालेला नाही.