India Vs Pakistan: टी20 वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाचे हे 6 धुरंदर आज पहिल्यांदाच पाकिस्तानविरोधात हायव्होल्टेज थरार प्रत्यक्ष मैदानात अनुभवणार!
टीम इंडियासाठी सर्वात मोठे आव्हान श्रीलंकेच्या खेळपट्ट्यांवर उस्मान तारिकची गोलंदाजी असेल. तारिकची संथ गोलंदाजी, वेगातील विविधता आणि कोन हे भारतीय फलंदाजांसाठी एक महत्त्वाचे आव्हान आहे.

India Vs Pakistan: टी-20 विश्वचषकातील भारत विरुद्ध पाकिस्तान सामना आज (15 फेब्रुवारी) होणार आहे. दोन्ही संघ कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर संध्याकाळी 7 वाजता एकमेकांसमोर येतील. भारताने 2007 आणि 2024 मध्ये टी-20 विश्वचषक जिंकला आहे, अंतिम सामन्यात पाकिस्तानला हरवून संघाने पहिले विजेतेपद पटकावले होते. दुसरीकडे, पाकिस्तान 2009 चा विजेता आहे आणि 2007 आणि 2022 मध्ये उपविजेता ठरला आहे. टीम इंडियासाठी सर्वात मोठे आव्हान श्रीलंकेच्या खेळपट्ट्यांवर उस्मान तारिकची गोलंदाजी असेल. तारिकची संथ गोलंदाजी, वेगातील विविधता आणि कोन हे भारतीय फलंदाजांसाठी एक महत्त्वाचे आव्हान आहे.
तब्बल सहा जण पहिल्यांदाच थरार अनुभवणार
दरम्यान, टीम इंडियाच्या प्लेईंग इलेव्हनमधील तब्बल सहा जण पहिल्यांदाच भारत पाकिस्तान थरार अनुभवणार आहेत. सलामीवीर अभिषेक शर्मा, इशान किशन, तिलक वर्मा, शिवम दुबे, रिंकू सिंह आणि वरुण चक्रवर्ती हे पहिल्यांदाच हायव्होल्टेज थरार मैदानात अनुभवणार आहेत.
भारताचे वर्चस्व सिद्ध करणारे दोन विक्रम
दरम्यान, या स्पर्धेत भारताने 10 सामन्यात पराभव पत्करलेला नाही. टी 20 विश्वचषकात सलग 10 सामने जिंकण्याचा विक्रम टीम इंडियाच्या नावावर आहे. 2024 मध्ये संघाने 8 सामने जिंकले आणि आता 2026 मध्ये 2 सामने जिंकून संघाने एक नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे.
8 पैकी 7 विश्वचषक सामन्यांमध्ये पाकिस्तानचा पराभव
टी20 विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यात आतापर्यंत आठ सामने झाले आहेत, ज्यात भारताने 7 जिंकले आहेत आणि पाकिस्तानने फक्त १ जिंकला आहे. टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्येही भारत आघाडीवर आहे. दोघांनी एकूण 16 टी20 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये भारताने १३ जिंकले आहेत आणि पाकिस्तानने फक्त ३ जिंकले आहेत.
टीम इंडिया पाकिस्तानशी शेकहँड करणार का?
या सामन्यात टीम इंडियाचे खेळाडू पाकिस्तानी खेळाडूंशी शेकहँड करतात का हे पाहणे मनोरंजक असेल. गेल्या सप्टेंबरमध्ये दुबई येथे झालेल्या आशिया कप दरम्यान, भारतीय संघाने पाकिस्तानी खेळाडूंशी हातमिळवणी करण्यास नकार दिला होता. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ हा निर्णय घेण्यात आला. आशिया कप जिंकल्यानंतरही भारतीय संघाने पीसीबी प्रमुख मोहसीन नक्वी यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारली नाही. त्यानंतर दोन्ही संघ पहिल्यांदाच एकमेकांसमोर आले आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या
























