लंडन: जगाचं लक्ष लागलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीवर पाकिस्तानने आपलं नाव कोरलं आहे. अंतिम फेरीत पाकिस्तानने टीम इंडियाचा तब्बल 180 धावांनी धुव्वा उडवला. पाकिस्तानला पहिल्यांदाच चॅम्पियन्स ट्रॉफीचं जेतेपद मिळालं.


पाकिस्तानी संघाने ठेवलेलं 339 धावांचं डोंगराएवढं लक्ष्य पार करताना भारताची चांगलीच दमछाक झाली. हार्दिक पांड्याच्या 76 धावांच्या बळावर भारताला सर्वबाद 158 धावांपर्यंतच मजल मारता आली.

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत प्रवेश करुन तिसऱ्यांदा जेतेपद मिळवण्याची स्वप्न पाहणाऱ्या टीम इंडियाला दारुण पराभवाला सामोरं जावं लागलं.

टीम इंडियाच्या पहिल्या फळीला फारशी चमकदार कामगिरी दाखवता आली नाही. मात्र हार्दिक पांड्याने चौकार, षटकारांच्या बळावर 76 धावा ठोकल्या. त्यामुळे भारताची आशा काही काळ जिवंत झाली होती, मात्र चोरटी धाव काढण्याच्या नादात पांड्या रनआऊट झाला आणि ती आशाही मावळली.

सलामीवीर रोहित शर्मा भोपळाही न फोडता बाद झाला. त्यानंतर शिखर धवनही अवघ्या 21 धावांसह तंबूत परतला. तर टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीही अवघ्या 5 धावांसह स्वस्तात माघारी परतला.

भारताची मदार असलेला सिक्सरकिंग युवराज 22, तर धोनी अवघ्या 4 धावांवर बाद झाला. त्यानंतर मिडल ऑर्डरमधला केदार जाधवही 9 धावांवर तंबूत परतला. त्यानंतर आलेल्या हार्दिक पांड्याने मात्र 76 धावांची खेळी केली. तळाचे फलंदाज जाडेजा(15), अश्विन(1), बुमरा (1), भुवनेश्वर (1*) फारशी चमक दाखवू शकले नाहीत.

-----------------------------

भारताला नववा धक्का, अश्विन अवघ्या एका धावेवर बाद

भारताला आठवा धक्का, रविंद्र जाडेजा 15 धावांवर माघारी

भारताला सातवा धक्का, हार्दिक पांड्या 76 धावांवर धावबाद

भारताला सहावा धक्का, केदार जाधव 9 धावांसह बाद

भारताला मोठा धक्का, धोनी अवघ्या 4 धावा करुन माघारी

भारताला चौथा धक्का, सिक्सरकिंग युवराज 22 धावांवर बाद

भारताला तिसरा धक्का, कोहली स्वस्तात माघारी, अवघ्या 5 धावांवर तंबूत

भारताला दुसरा धक्का, शिखर धवन 21 धावांवर बाद

भारताला जबरदस्त धक्का, हिटमॅन रोहित शर्मा भोपळाही न फोडता बाद

----------------------------

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या मेगाफायनलमध्ये पाकिस्तानने भारतासमोर 339 धावांचं लक्ष्य ठेवलं असून, भारतीय फलंदाजीला सुरुवात झाली आहे. पण पहिल्याच षटकात भारताला पहिला धक्का बसला आहे. रोहित शर्माला शून्यावर माघारी परतावं लागलं आहे. तर त्या पाठोपाठ आलेला कर्णधार विराट कोहलीलादेखील स्वस्तात माघारी जावं लागलं.

सलामीवीर फकर झमानचं खणखणीत शतक, अझर अली आणि मोहम्मद हाफिजच्या अर्धशतकांच्या जोरावर पाकिस्तानने निर्धारित 50 षटकांत 4 विकेट्स गमावून 338 धावा केल्या. बोथट गोलंदाजीमुळे भारतीय गोलंदाजांना पाकिस्तानी फलंदाजांना वेसण घालता आली नाही.

या सामन्यात विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. पाकिस्तानकडून सलामीसाठी आलेल्या फकर झमान आणि अझर अली यांची जोडी जम धरत असतानाच, बुमराहने एका अप्रतिम चेंडूवर फकरला धोनीकडे झेल देण्यास भाग पाडलं. मात्र बुमराहचा तो बॉल 'नो बॉल' ठरला. त्यावेळी फकर अवघ्या तीन धावांवर होता.

यानंतर मग फकर-अझरने अप्रतिम फलंदाजी करत, भारतीय गोलंदाजांची धुलाई केली. या जोडीने 128 धावांची सलामी दिली.

-----------------------------

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये भारताने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. भारताने संघात कोणताही बदल केलेला नाही.

भारताला चौथं यश, बाबर आझम (46) बाद, पाकिस्तान 267/4 (42.3)

भारताला तिसरं यश,  शोएब मलिक बाद

भारताला दुसरं यश मिळालं. फकर झमान (114)  धावा करुन बाद झाला.

पाकिस्तानचा सलामीवर फकर झमानने खणखणीत शतक ठोकलं आहे. झमानने 93 चेंडूंत 100 धावा केल्या.

पाकिस्तानचे सलामीवीर फकर झमन आणि अझर अली यांनी धडाकेबाज सुरुवात केली. या जोडीने शंभर धावांचा टप्पा ओलांडला. या जोडीने वैयक्तिक अर्धशतकं झळकवाली. मात्र एक चोरटी धाव घेण्याच्या नादात अझर अली धावबाद झाला.

सुरुवातीच्या षटकात बुमराने फकरला धोनीकरवी झेलबाद केलं होतं. मात्र बुमराहने फेकलेला तो चेंडू नो बॉल ठरला. त्याचाच फायदा पाकिस्तानने उचलला आहे.

  • भारतीय संघ - रोहित, धवन, कोहली, युवराज, धोनी, केदार, पांड्या, जाडेजा, अश्विन, भुवी, बुमराह

  • पाकिस्तानी संघात एक बदल, रुमान रईसऐवजी मोहम्मद आमीरचं पुनरागमन

  • फकर 22*, अझर 30*, पाकिस्तान 63/0 (11)

  • फकर 27*, अझर 31*, पाकिस्तान 69/0 (12)

  • फकर 33*, अझर 40*, पाकिस्तान 86/0 (15)

  • फकर 36*, अझर 44*, पाकिस्तान 93/0 (17)

  • फकर 42*, अझर 48*, पाकिस्तान 103/0 (19)

  •  अझर अली आणि फकरची  अर्धशतकं, पाकिस्तान 114/0 (20)

  • फकर 54*, अझर 58*, पाकिस्तान 125/0 (22)

  • भारताला पहिलं यश, अझर अली (59) धावबाद, पाकिस्तान 128/1 (23)

  • फकर 61*, बाबर 1*, पाकिस्तान 134/1 (25)

  • फकर 76*, बाबर 2*, पाकिस्तान 150/1 (26)

  • फकर 89*, बाबर 4*, पाकिस्तान 167/1 (27)

  • फकर 94*, बाबर 7*, पाकिस्तान 175/1 (28)

  • फकर 95*, बाबर 7*, पाकिस्तान 176/1 (29)

  • पाकिस्तानचा सलामीवर फकर झमानने खणखणीत शतक ठोकलं आहे. झमानने 93 चेंडूंत 100 धावा केल्या.

  • भारताला दुसरं यश, फकर झमान (114) बाद, पाकिस्तान 200/2 (33.1)


पाकिस्तानला हरवण्यासाठी विराटची टीम इंडिया सज्ज आहे..आणि देशभरातही क्रिकेटचा ज्वर चढला आहे.

जवानांनीही टीम इंडियाला चिअरअप केलंय. तर मंदिरांमध्येही प्रार्थनेला सुरुवात झाली आहे. भारताच्या विजयासाठी क्रिकेटप्रेमींनी देवाला साकडं घातलं आहे.



चॅम्पियन्स ट्रॉफीचं रणांगण असो वा विश्वचषकाचं महायुद्ध, एरवी भारत-पाकिस्तानचा सामना आला की, चॅम्पियन्स ट्रॉफी कोण जिंकणार किंवा विश्वचषक कोण जिंकणार हा प्रतिष्ठेचा प्रश्न साईडट्रॅक होतो आणि ऐरणीवर येतो तो अस्मितेचा मुद्दा.

IndvsPak Final CT 2017: फायनल कुठे, कधी, कशी पाहता येईल?

भारतीय पाठीराखे म्हणतात.. आधी पाकिस्तानला हरवा, विजेतेपदाचं नंतर बघू. तर पाकिस्तानी समर्थक म्हणतात आधी भारताला हरवा, विजेतेपद नाही मिळालं तरी चालेल. इंग्लंडमधल्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलच्या निमित्तानं क्रिकेटिंग प्रतिष्ठेचा आणि भारत-पाकिस्तान अस्मितेचा मुद्दा एक झाला आहे.

दहा वर्षानंतर दुसरी फायनल

आयसीसी इव्हेण्टसच्या इतिहासात भारत आणि पाकिस्तान फायनलच्या रणांगणात आमनेसामने येण्याची ही दुसरीच वेळ आहे. 2007 साली दक्षिण आफ्रिकेतल्या पहिल्या ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकात धोनीची टीम इंडिया वि. शोएब मलिकची पाकिस्तानी फौज अशी फायनल रंगली होती. त्या फायनलच्या आठवणी आजही ताज्या आहेत.

भारत नव्हे, आकडे बोलतात, पाकिस्तानमधले टीव्ही पुन्हा फुटणार!

टीम इंडियाला विजयासाठी केवळ एक विकेट हवी असताना, मिसबाह उल हकनं पाकिस्तानलाही चार चेंडूंत सहा धावा असं विजयाच्या उंबरठ्यावर आणून ठेवलं. पण त्याच मिसबाहनं जोगिंदर शर्माच्या पुढच्या चेंडूवर स्कूपचा फटका खेळण्याचं केलेलं वेडं साहस, शॉर्ट फाईन लेगला श्रीशांतच्या हातात त्याचा सोपा झेल आणि धोनीच्या हातात ट्वेन्टी ट्वेन्टीचा पहिला विश्वचषक देणारं ठरलं.

2007 सालच्या त्या भारत-पाकिस्तान फायनलचं बॅटलफिल्ड होतं जोहान्सबर्गचं वॉण्डरर्स स्टेडियम. दहा वर्षांनी भारत आणि पाकिस्तान संघांत होत असलेल्या फायनलचं बॅटलफिल्ड आहे लंडनचं केनिंग्टन ओव्हल.

भारताचं वर्चस्व

चॅम्पियन्स ट्रॉफीतल्या भारत-पाकिस्तान फायनलच्या निमित्तानं विश्वचषकाचा इतिहास पाहायचा झाला, तर भारतानं पाकिस्तानवर 10-0 असं निर्विवाद वर्चस्व गाजवलं आहे.

वन डेच्या विश्वचषकात भारतानं सहापैकी सहा सामन्यांत पाकिस्तानला लोळवलं आहे, तर ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकात भारतानं चारपैकी चार सामन्यांत पाकिस्तानवर कुरघोडी केली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीत भारत आणि पाकिस्तानच्या एकमेकांवरच्या विजयाचं समीकरण हे 2-2 असं आहे.

विराटच्या टीम इंडियानं चॅम्पियन्स ट्रॉफीतल्या लढायांमध्ये पाकिस्तानशी 2-2 अशी बरोबरी साधली, ती यंदाच्या सलामी सामन्यात. बर्मिंगहॅमच्या त्या लढाईत टीम इंडियानं पाकिस्तानचा तब्बल 124 धावांनी धुव्वा उडवला होता. पण त्यानंतर गेल्या दोन आठवड्यात लंडन ब्रिजखालून थेम्सचं बरंच पाणी वाहून गेलं आहे.

पाकिस्तानला फायनलचं तिकीट

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सलामीच्या सामन्यात झालेला पराभव सरफराज अहमद आणि त्याच्या शिलेदारांना इतका बोचला की, पाकिस्तानी फौजेनं त्या पराभवाचा राग दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि इंग्लंडवर काढला. पाकिस्ताननं सलग तीन सामन्यांमध्ये तीन प्रतिस्पर्ध्यांना अक्षरश: बुकलून काढलं आणि मोठ्या रुबाबात फायनलचं तिकीट मिळवलं. पाकिस्तानच्या या तिन्ही विजयांमधला समान दुवा एकच आहे तो म्हणजे म्हणजे त्यांचं प्रभावी आक्रमण. प्रतिस्पर्ध्यांना आधी स्वस्तात गुंडाळायचं आणि मग फलंदाजांनी सहज विजयी लक्ष्य गाठायचं हा आहे पाकिस्तानचा सक्सेस फॉर्म्युला.

भारताचे फॉर्ममधील फलंदाज

पाकिस्तानच्या या सक्सेस फॉर्म्युलावर घाव घालायचा तर टीम इंडियाला फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही आघाड्यांवर आपली कामगिरी उंचावावी लागणार आहे. भारताच्या सुदैवानं रोहित शर्मा, शिखर धवन आणि विराट कोहली हे तिन्ही फलंदाज चॅम्पियन्स ट्रॉफीत सुपर फॉर्ममध्ये आहेत. पण युवराजसिंग, महेंद्रसिंग धोनी, केदार जाधव आणि रवींद्र जाडेजाकडून मिळालेल्या संधीचं सोनं कऱण्याची अपेक्षा राहिल.

भारताचं आक्रमण

पाकिस्तानच्या तुलनेत भारताचं आक्रमण शेरास सव्वाशेर आहे. भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमराला छान लय मिळाली आहे. रवींद्र जाडेजा आणि केदार जाधवची फिरकी सामन्याला गिरकी देत आहे. चिंता वाटते की ती फक्त ऑफ स्पिनर रवीचंद्रन अश्विनच्या फॉर्मची. पण अश्विनला वगळून उमेश यादव किंवा मोहम्मद शमीला घ्यायचं तरी ती चिंता चुकणार नाही. त्यामुळं कदाचित अश्विनलाच खेळवण्याचं धाडस खेळलं जाईल.

टीम इंडियाची चॅम्पियन्स ट्रॉफीमधल्या फायनलची लढाई ही पाकिस्तानशी आहे. त्यामुळं ही लढाई जिंकायची तर विराटला कधी धाडसी निर्णय घ्यावा लागेल, तर कधी धाडसी खेळही करावा लागेल. पाकिस्तानला लोळवून चॅम्पियन्स ट्रॉफी पुन्हा जिंकायची तर टीम इंडिया नक्कीच मागं हटणार नाही.

विजय साळवी, एबीपी माझा, मुंबई

संबंधित बातम्या

मोहम्मद आमिरचा मंदपणा, उत्साहाच्या भरात ‘गेम प्लॅन’ जाहीर

‘नॉन स्ट्राईकर एंडवर तुझा बाप उभा आहे, त्याला टाक बाऊन्सर’ 

भारत नव्हे, आकडे बोलतात, पाकिस्तानमधले टीव्ही पुन्हा फुटणार!