लंडन: चॅम्पियन्स ट्रॉफी वर पाकिस्तानने पहिल्यांदाच नाव कोरलं आहे. अंतिम फेरीत पाकिस्तानने टीम इंडियाचा तब्बल 180 धावांनी धुव्वा उडवला. भारताच्या दारुण पराभवाची काय कारणं आहेत, यावर तज्ज्ञ चर्चा करत आहेत.
भारताच्या पराभवाची पाच कारणं
1. भुवनेश्वरने पाकिस्तानच्या धावा रोखल्या, पण सलामीची जोडी फोडण्यात अपयश
2. जसप्रीत बुमरा आणि हार्दिक पांड्या यांचा दिशाहीन मारा
3. आर आश्विन आणि रविंद्र जाडेजा यांचं फिरकी अस्त्र निकामी
4. पाकिस्तानच्या आक्रमणासमोर टीम इंडियाचे महारथी कोहली, रोहित शर्मा, धोनी, युवराज यांचं सपशेल लोटांगण
5. कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वात चुका
पाकिस्तानच्या विजयाची पाच कारणं
1. सलामीच्या सामन्यात पत्करलेल्या पराभवातून पाकिस्तानने धडा घेतला
2. वेगवान आक्रमण या बलस्थानावर पाक गोलंदाजांनी भर दिला
3. प्रथम फलंदाजी करण्याच्या मिळालेल्या संधीचं पाकनं सोनं केलं
4. पाकिस्तानने आपला स्कोअर बोर्ड टप्प्याटप्प्याने फिरता ठेवला
5. पाकिस्तानी खेळाडूंनी क्षेत्ररक्षणामध्ये सुधारणा केली
पाकिस्तानी संघाने ठेवलेलं 339 धावांचं डोंगराएवढं लक्ष्य पार करताना भारताची चांगलीच दमछाक झाली. हार्दिक पांड्याच्या 76 धावांच्या बळावर भारताला सर्वबाद 158 धावांपर्यंतच मजल मारता आली.
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत प्रवेश करुन तिसऱ्यांदा जेतेपद मिळवण्याची स्वप्न पाहणाऱ्या टीम इंडियाला दारुण पराभवाला सामोरं जावं लागलं.
टीम इंडियाच्या पहिल्या फळीला फारशी चमकदार कामगिरी दाखवता आली नाही. मात्र हार्दिक पांड्याने चौकार, षटकारांच्या बळावर 76 धावा ठोकल्या. त्यामुळे भारताची आशा काही काळ जिवंत झाली होती, मात्र चोरटी धाव काढण्याच्या नादात पांड्या रनआऊट झाला आणि ती आशाही मावळली.
सलामीवीर रोहित शर्मा भोपळाही न फोडता बाद झाला. त्यानंतर शिखर धवनही अवघ्या 21 धावांसह तंबूत परतला. तर टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीही अवघ्या 5 धावांसह स्वस्तात माघारी परतला.
भारताची मदार असलेला सिक्सरकिंग युवराज 22, तर धोनी अवघ्या 4 धावांवर बाद झाला. त्यानंतर मिडल ऑर्डरमधला केदार जाधवही 9 धावांवर तंबूत परतला. त्यानंतर आलेल्या हार्दिक पांड्याने मात्र 76 धावांची खेळी केली. तळाचे फलंदाज जाडेजा(15), अश्विन(1), बुमरा (1), भुवनेश्वर (1*) फारशी चमक दाखवू शकले नाहीत.
सलामीवीर फकर झमानचं खणखणीत शतक, अझर अली आणि मोहम्मद हाफिजच्या अर्धशतकांच्या जोरावर पाकिस्तानने निर्धारित 50 षटकांत 4 विकेट्स गमावून 338 धावा केल्या. बोथट गोलंदाजीमुळे भारतीय गोलंदाजांना पाकिस्तानी फलंदाजांना वेसण घालता आली नाही.
या सामन्यात विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. पाकिस्तानकडून सलामीसाठी आलेल्या फकर झमान आणि अझर अली यांची जोडी जम धरत असतानाच, बुमराहने एका अप्रतिम चेंडूवर फकरला धोनीकडे झेल देण्यास भाग पाडलं. मात्र बुमराहचा तो बॉल 'नो बॉल' ठरला. त्यावेळी फकर अवघ्या तीन धावांवर होता.
यानंतर मग फकर-अझरने अप्रतिम फलंदाजी करत, भारतीय गोलंदाजांची धुलाई केली. या जोडीने 128 धावांची सलामी दिली.