नेपियर : विराट कोहलीच्या टीम इंडियाने ऑस्ट्रेलिया दौऱ्यातला विजयी सिलसिला न्यूझीलंड दौऱ्यातही कायम ठेवला आहे. भारतीय संघाने नेपियरच्या पहिल्या वन डेत न्यूझीलंडचा आठ विकेट्स आणि 85 चेंडू राखून धुव्वा उडवला. या विजयासह टीम इंडियाने पाच वन डे सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.

या सामन्यात न्यूझीलंडने भारताला विजयासाठी 158 धावांचं माफक आव्हान दिलं होतं. या सामन्यात आलेल्या व्यत्ययानंतर भारतीय संघाला 49 षटकांत 156 धावांचं लक्ष्य देण्यात आलं होतं. शिखर धवन आणि विराट कोहलीने दुसऱ्या विकेटसाठी केलेल्या 81 धावांच्या भागीदारीने टीम इंडियाला विजयपथावर नेलं. विराटने तीन चौकारांसह ४५ धावांची, तर धवनने चौकारांसह नाबाद धावांची खेळी उभारली.

...आणि सूर्यकिरणामुळे खेळ थांबला!

INDvsNZ : भारताकडून न्यूझीलंडचा 8 विकेट्सनी धुव्वा

भारत विरुद्ध न्यूझीलंड संघांमधील पहिल्या वन डे सामन्यात स्वच्छ सूर्यप्रकाश असूनही खेळ थांबवण्याचा निर्णय घ्यावा लागला होता. कारण नेपियरच्या आकाशात तळपणाऱ्या सूर्याची किरणं थेट खेळाडू आणि पंचांच्या डोळ्यावर येत होती. शिखर धवननं केलेल्या तक्रारीनंतर खेळ थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला. खेळाडू आणि पंचांची सुरक्षितता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला होता.

या वन डेत स्वच्छ सूर्यप्रकाश असूनही पंचांना खेळ थांबवण्याचा निर्णय घ्यावा लागला होता. हा अनपेक्षित ब्रेक 30 मिनिटांचा होता. याआधी पाऊस, खराब हवामानामुळे खेळ थांबलेला आपण पाहिलं किंवा ऐकलं असेल. पण आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात सूर्याच्या किरणांनी खेळ थांबवल्याची ही दुसरी घटना होती.

दोन वर्षांपूर्वी बांगलादेश आणि न्यूझीलंड संघांमधल्या ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यात असा प्रकार घडला होता. 19 जानेवारीला न्यूझीलंडमधला सुपर स्मॅश सामन्यातही सूर्यकिरणांमुळे खेळ थांबवण्याची वेळ आली होती.

टीम इंडियासमोर 158 धावांचं लक्ष्य



टीम इंडियाच्या गोलंदाजांनी ऑस्ट्रेलिया दौऱ्यापाठोपाठ न्यूझीलंड दौऱ्यातल्या सलामीच्या वन डे सामन्यातही आपला तिखटपणा दाखवून दिला. या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी न्यूझीलंडचा अवघ्या 157 धावांत खुर्दा उडवला आहे. त्यामुळे टीम इंडियासमोर विजयासाठी 158 धावांचं माफक आव्हान आहे.

भारत आणि न्यूझीलंड संघांमधल्या पाच वन डे सामन्यांच्या मालिकेतला सलामीच्या सामन्यात नाणेफेक जिंकून न्यूझीलंडने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. मोहम्मद शमीने मार्टिन गप्टिल आणि कॉली मन्रो या सलामीच्या फलंदाजांना माघारी धाडून न्यूझीलंडची अवस्था चौथ्याच षटकात दोन बाद 18 अशी केली होती. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी ठराविक अंतराने न्यूझीलंडला एकेक धक्का दिला. भारताकडून कुलदीप यादवने चार, तर मोहम्मद शमीने तीन फलंदाजांना माघारी धाडलं. यजुवेंद्र चहलने दोन, तर केदार जाधवने एक विकेट काढली.

मोहम्मद शमीचा पराक्रम

भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने नेपियर वन डेत आपल्या शिरपेचात मानाचा नवा तुरा खोवला. वन डे सामन्यांच्या इतिहासात विकेट्सचं शतक सर्वात जलद गाठणारा भारतीय गोलंदाज हा मान आता शमीच्या नावावर झाला आहे. त्याने न्यूझीलंडच्या मार्टिन गप्टिलला माघारी धाडून, वन डे कारकीर्दीतल्या विकेट्सचं शतक साजरं केलं. न्यूझीलंड दौऱ्यातला नेपियरचा सामना ही शमीच्या कारकीर्दीतली 56वी वन डे आहे. याआधी इरफान पठाणने वन डे कारकीर्दीतल्या 100 विकेट्सचा पल्ला 59 सामन्यांमध्ये गाठला होता. झहीर खान, अजित आगरकर आणि जवागल श्रीनाथ यांनी अनुक्रमे 65, 67 आणि 68 वन डे सामन्यांमध्ये विकेट्सचं शतक गाठलं होतं.

न्यूझीलंडच्या आव्हानाला टीम इंडिया सज्ज



दरम्यान, इंग्लंडमधल्या आगामी विश्वचषकाच्या दृष्टीने टीम इंडियाला न्यूझीलंडमधली मालिका महत्त्वाची ठरणार आहे. अनुभवी यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनीने ऑस्ट्रेलियात लागोपाठ तीन अर्धशतकं झळकावून तिथली मालिका गाजवली. त्यानंतरही न्यूझीलंड दौऱ्यात आपली मधली फळी आणखी मजबूत करण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न राहिल.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यात पहिल्यांदाच कसोटी आणि वन डे सामन्यांची मालिका जिंकणारी टीम इंडिया आता न्यूझीलंडच्या आव्हानाला सामोरी जायला सज्ज झाली आहे.

भारतीय संघ : रोहित शर्मा, शिखर धवन, विराट कोहली (कर्णधार), अंबाती रायुडू, महेंद्रसिंह धोनी (यष्टीरक्षक), केदार जाधव, विजय शंकर, भुवनेश्वर कुमार, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, यजुवेंद्र चहल

न्यूझीलंड संघ : मार्टिन गप्टिल, कॉलिन मुन्रो, केन विल्यमसन (कर्णधार), रॉस टेलर, टॉम लॅथम (यष्टीरक्षक), हेन्री निकोल्स, मिचेल सँटनर, डो ब्रेसवेल, टीम साऊदी, लॉकी फर्ग्युसन, ट्रेन्ट बोल्ट