नॉटिंगहॅम : भारत आणि इंग्लंडमधील तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. कसोटी मालिकेतील पहिले दोन सामने गमावल्यानंतर हा सामना जिंकून मालिकेतील आव्हान कायम ठेवण्याचं मोठं दडपण टीम इंडियासमोर असणार आहे.

पहिल्या दोन सामन्यातील लाजिरवाण्या पराभवानंतर कर्णधार विराट कोहलीने संघान मोठे बदल केले आहेत. विकेटकीपर दिनेश कार्तिकला आजच्या सामन्यात संघाबाहेर ठेवण्यात आलं आहे.

रिषभ पंतचं कसोटी संघात आगमन

कार्तिकच्या जागी 20 वर्षीय रिषभ पंतला कसोटी सामन्यात संधी देण्यात आली आहे. रिषभ पंतचा हा पहिला कसोटी सामना असणार आहे. भारताकडून कसोटी सामन्यात पदार्पण करणार रिषभ 291वा खेळाडू ठरला आहे. रिषभने भारत अ संघाकडून खेळताना इंग्लंडमध्ये जबरदस्त खेळी केली आहे. त्याच्या या कामगिरीच्या जोरावर त्याला कसोटी क्रिकेटमध्ये संधी मिळाली आहे.


धवन, बुमराहचं संघात पुनरागमन

कार्तिकसोबत मुरली विजयलाही संघात अंतिम अकरामध्ये स्थान मिळालेलं नाही. विजयच्या जागी शिखर धवनचं पुनरागमन झालं आहे. तर कुलदीप यादवच्या जागी जसप्रीत बुमराहचं संघात आगमन झालं आहे. पहिल्या दोन कसोटी सामन्यात फिट नसल्याने बुमराहला बाहेर बसावं लागलं होतं. मात्र आता तो फिट असल्याने टीम इंडियाच्या गोलंदाजीची कमान सांभाळण्यासाठी तो सज्ज आहे.

मिडल ऑर्डरच्या फॉर्मची चिंता कामय

टीम इंडियाच्या मिडल ऑर्डरची धुरा चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे यांच्या खांद्यावर आहे. मात्र विराटला वगळता पुजारा आणि रहाणेला अद्यापही इंग्लंडमध्ये सूर गवसलेला नाही. मात्र या सामन्यात रिषभ पंत, हार्दिक पांड्या आणि आर अश्विनच्या मदतीने मिडल ऑर्डर आपली चमक दाखवेल अशी आशा आहे.

इंग्लंडच्या संघातही बदल

इंग्लंडच्या संघातही काही बदल करण्यात आले आहेत. पहिल्या सामन्यातील हिरो सॅम करनला तिसऱ्या सामन्यात संघात जागा मिळालेली नाही. करनच्या जागी इंग्लंडने ऑल राउंडर बेन स्टोक्सला संघात सामिल केलं आहे. स्टोक्स लॉर्ड्स टेस्टमध्ये काही कारणास्तव संघाबाहेर होता. स्टोक्सच्या पुनरागमनाने इंग्लंडचा संघ आणखी मजबूत झाला आहे.