चेन्नई: इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटीत पहिल्या दिवसअखेर टीम इंडिया बॅकफूटवर गेली आहे.

शतकवीर मोईन अलीला ज्यो रूट आणि जॉनी बेअरस्टो यांनी दिलेल्या दमदार साथीनं, इंग्लंडने दिवसअखेर चार बाद 284 धावांची मजल मारली. मोईन अली 120 धावांवर तर बेन स्टोक्स पाच धावांवर खेळत आहे.

वास्तविक ईशांत शर्मानं कीटन जेनिंग्सला आणि रवींद्र जाडेजानं अॅलेस्टर कूकला बाद करून इंग्लंडची 2 बाद 21 अशी अवस्था केली होती. पण ज्यो रूट आणि मोईन अलीनं तिसऱ्या विकेटसाठी 146 धावांची भागीदारी रचून इंग्लंडचा डाव सावरला.



रूट दहा चौकारांसह 88 धावांची खेळी करून बाद झाला. त्यानंतर मोईन अलीनं जॉनी बेअरस्टोसह चौथ्या विकेटसाठी 86 धावांची भागीदारी रचली.

बेअरस्टोनं तीन षटकारांसह 49 धावांची खेळी उभारली. मोईन अलीनं नाबाद 120 धावांची खेळी बारा चौकारांनी सजवली.

दरम्यान, या कसोटीत इंग्लंडनं प्रथम नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. विराट कोहलीची टीम इंडिया इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत एका ऐतिहासिक विजयाच्या उंबरठ्यावर आहे. टीम इंडियानं मुंबईची चौथी कसोटी जिंकून पाच सामन्यांच्या मालिकेत 3-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. आजपासून चेन्नईत पाचवी आणि अखेरची कसोटी खेळविण्यात येत आहे. त्यामुळे अंतिम कसोटी जिंकून इंग्लंडवर 4-0 असा विजय साजरा करण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न असणार आहे.

भारत संघ: विराट कोहली (कर्णधार) मुरली विजय, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, के नायर, आर. अश्विन, पार्थिव पटेल (विकेटकीपर), रविंद्र जाडेजा, अमित मिश्रा, उमेश यादव, इशांत शर्मा

इंग्लंड संघ: अॅलिस्टर कुक (कर्णधार), केटन जेनिंग्स, जो रूट, मोइन अली, जॉनी बेयरस्टो (विकेटकीपर), बेन स्टोक्स, जोस बटलर, लियाम डॉसन, आदिल राशिद, स्टुअर्ट ब्रॉड, जॅक बॉल

84 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडण्याची टीम इंडियाला संधी


कसोटी क्रिकेटच्या 84 वर्षांच्या इतिहासात भारतानं आजवर इंग्लंडला 4-0 इतक्या मोठ्या फरकानं कधीच हरवलेलं नाही. 1932 सालापासून भारतीय संघ आजवर 151 कसोटी मालिकांमध्ये खेळला आहे. पण त्यात भारताला केवळ एकदाच 4-0 असा विजय साजरा करता आला आहे. 2013 साली भारतानं ऑस्ट्रेलियाला 4-0 असं हरवलं होतं. आता विराटची टीम इंग्लंडला 4-0 अशा फरकानं हरवणार का, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

सुनील गावसकरांचा विक्रम मोडण्याची विराटला नामी संधी

टीम इंडियाचा कसोटी कर्णधार विराट कोहलीला आता सुनील गावसकरांचा विक्रम खुणावतो आहे. कोहलीनं इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या चार कसोटी सामन्यांच्या सात डावांत मिळून 128च्या सरासरीनं 640 धावांचा रतीब घातला आहे. एकाच कसोटी मालिकेत भारताकडून सर्वाधिक 774 धावांचा विक्रम सुनील गावसकरांच्या नावावर आहे. गावसकरांनी आपल्या पहिल्याच कसोटी मालिकेत म्हणजे 1971 सालच्या वेस्ट इंडीज दौऱ्यावर ही कामगिरी केली होती. गावसकरांचा हा विक्रम मोडण्यासाठी कोहलीला अजून 135 धावांची गरज आहे. कोहलीनं याआधी 2014-2015 सालच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात 692 धावांचा रतीब घातला होता.