मुंबई : कोलंबोतल्या तिरंगी मालिकेत रोहित शर्माच्या टीम इंडियाचा अंतिम सामना उद्या (रविवार) शकिब अल हसनच्या बांगलादेशशी होईल. या सामन्यात विजयाची गुढी उभारुन, विजेतेपदावर नाव कोरण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न राहिल. पण बांगलादेशी खेळाडू आणि त्यांच्या पाठिराख्यांचा वाढता अखिलाडूपणा लक्षात घेतला, तर भारतीय क्रिकेटरसिक केवळ विजेतेपदावर समाधान मानणार नाहीत. तिरंगी मालिकेच्या अंतिम सामन्यात बांगलादेशच्या नांग्या ठेचूनच, कोलंबोच्या रणांगणात विजयाची गुढी उभारा.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या मैदानात आजवर रॉयल बांगला टायगर्स अशीच बांगलादेशच्या फौजेची ओळख होती. पण कोलंबोतल्या तिरंगी मालिकेच्या निमित्तानं बांगलादेशी वाघांना किंग कोब्रासारखा फणा काढताना पुन्हा पुन्हा पाहायला मिळालं.
बांगलादेशी खेळाडूंच्या कोब्रा सेलिब्रेशनची सुरुवात खरं तर श्रीलंकेच्या बांगलादेश दौऱ्यात झाली होती. पण कोलंबोतल्या तिरंगी मालिकेत श्रीलंकेला बांगलादेशकडून दुसऱ्यांदा पराभवाचा डंख बसला आणि कोब्रा डान्सनं सेलिब्रेशनचं टोक गाठलं.
श्रीलंका आणि बांगलादेश संघांमधल्या त्या अखेरच्या साखळी सामन्यात खेळाचे, वादाचे आणि अखिलाडू वृत्तीचेही अनेक रंग पाहायला मिळाले. पण त्या सामन्यात मिळालेल्या चुरशीच्या विजयानं बांगलादेशी वाघांच्या आत्मविश्वासाला नवी धार चढली आहे. साहजिकच कोलंबोच्या रणांगणात भारत आणि बांगलादेश संघांत होणारा तिरंगी मालिकेचा अंतिम सामना हा वन डे क्रिकेटची असली मजा देणारा ठरेल.
कोलंबोतल्या या मालिकेत भारतानं चारपैकी तीन सामन्यांमध्ये विजय मिळवून फायनलचं तिकीट कन्फर्म केलं. बांगलादेशला तर भारताकडून दोन्ही साखळी सामन्यांमध्ये हार स्वीकारावी लागली आहे. पण श्रीलंकेवरच्या दोन्ही विजयांनी त्यांचा आत्मविश्वास ढासळू दिलेला नाही. त्यामुळंच फायनलच्या मैदानात टीम इंडियाला बांगलादेशच्या आव्हानाला कमी लेखता येणार नाही.
कोलंबोतल्या तिरंगी मालिकेत बांगलादेशची फलंदाजी ही प्रामुख्यानं मुशफिकूर रहिम आणि तमिम इक्बाल या दोघांवर अवलंबून असलेली दिसली. मुशफिकूरनं चार सामन्यांमध्ये ९५च्या सरासरीनं १९० धावांचा रतीब घातला आहे. त्याची नाबाद ७२ ही सर्वोत्तम खेळी ठरली आहे. तमिम इक्बालनं चार सामन्यांमध्ये ३४.७५च्या सरासरीनं १३९ धावा केल्या आहेत. मुस्तफिजूर रहमान आणि रुबेल हुसेनच्या दुधारी आक्रमणानं तिरंगी मालिकेत बांगलादेशचं आव्हान तोलून धरलं आहे. मुस्तफिजूरनं चार सामन्यांमध्ये १५६ धावा मोजून सहा फलंदाजांना माघारी धाडलं आहे, तर रुबेलनं चार सामन्यांमध्ये १३७ धावांत चार विकेट्स काढल्या आहेत.
बीसीसीआयनं कोलंबोतल्या तिरंगी मालिकेसाठी विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनी यांच्यासारख्या अनुभवी शिलेदारांना विश्रांती दिली होती. त्या दोघांच्या अनुपस्थितीत शिखऱ धवन, रोहित शर्मा, मनीष पांडे आणि सुरेश रैना यांनी टीम इंडियाला धावांची रसद पुरवली. शिखर धवननं सातत्य कायम राखून, चार सामन्यांमध्ये ४७च्या सरासरीनं १८८ धावांचा रतीब घातला. त्यात दोन अर्धशतकांचा समावेश आहे.
कर्णधार रोहित शर्मा पहिल्या तीन सामन्यांमध्ये अपयशी ठरला. पण बांगलादेशविरुद्धच्या अखेरच्या साखळी सामन्यात, त्यानं कर्णधाराला साजेशी खेळी उभारली आणि टीम इंडियाला फायनलचं तिकीटही मिळवून दिलं. रोहितनं चार सामन्यांमध्ये एका अर्धशतकासह ११७ धावा फटकावल्या आहेत. मनीष पांडेनं चार सामन्यांमध्ये १०६च्या सरासरीनं १०६ धावा केल्या आहेत. तसंच सुरेश रैनानं चार सामन्यांमध्ये २५.७५च्या सरासरीनं १०३ धावा केल्या आहेत.
तिरंगी मालिकेतल्या भारताच्या यशात फलंदाजांइतकंच गोलंदाजांचही योगदान तितकंच मोलाचं आहे. सलामीच्या सामन्याचा अपवाद वगळता भारतीय गोलंदाजांनी उर्वरित मालिकेवर वर्चस्व गाजवलं. ऑफ स्पिनर वॉशिंग्टन सुंदरनं चार सामन्यांमध्ये केवळ ९४ धावा मोजून सात फलंदाजांना माघारी धाडलं आहे. शार्दूल ठाकूरनं चार सामन्यांमध्ये १३१ धावा मोजून सहा विकेट्स घेतल्या आहेत. लेग स्पिनर यजुवेंद्र चहलनं चार सामन्यांमध्ये १११ धावांच्या मोबदल्यात पाच विकेट्स घेतल्या आहेत. डावखुरा वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकटनंही तीन सामन्यांमध्ये १०६ धावा मोजून पाच विकेट्स घेतल्या आहेत.
एकंदरीत काय, तर बांगलादेशी वाघांच्या तुलनेत भारतीय सिंहांनी बजावलेली वैयक्तिक आणि सांघिक कामगिरी अधिक सरस आहे. त्यामुळं तिरंगी मालिकेच्या अंतिम सामन्यात विजयाची गुढी उभारुन रोहित शर्मा आणि त्याची टीम इंडिया निदाहास करंडकावर आपलं नाव कोरेल असा विश्वास आहे. पण भारताविरुद्धच्या सामन्याच्या निमित्तानं अलीकडच्या काळात, मैदानात आणि मैदानाबाहेरही अखिलाडूपणाचा कहर म्हणजे बांगलादेश असं चित्र वारंवार दिसून आलं आहे. त्यामुळं तिरंगी मालिकेच्या अंतिम सामन्यात बांगलादेशवरचा विजय पुरेसा ठरणार नाही, तर या मैदानात त्या बांगलादेशच्या नांग्याच ठेचायला हव्यात.
बांगलादेशच्या नांग्या ठेचा आणि विजयाची गुढी उभारा!
सिद्धेश कानसे, एबीपी माझा, मुंबई
Updated at:
17 Mar 2018 08:50 PM (IST)
मैदानात आणि मैदानाबाहेरही अखिलाडूपणाचा कहर म्हणजे बांगलादेश... असं चित्र वारंवार दिसून आलं आहे. त्यामुळं अंतिम सामन्यात बांगलादेशवरचा विजय पुरेसा ठरणार नाही, तर या मैदानात त्या बांगलादेशच्या नांग्याच ठेचायला हव्यात.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -